Patanjali Foods: रामदेव बाबांच्या कंपनीचे शेअर्स गडगडले! गुंतवणूकदारांना 7000 कोटींचं नुकसान

Baba Ramdev Patanjali Foods Shares Goes Down Investors Lost 7000 Crore: आठड्याभरात कंपनीचं एकूण मुल्यही मोठ्या प्रमाणात कमी झालं असून शेअर्सचा दर 1100 वरुन 1000 रुपयांच्या खाली आला आहे.

Updated: Feb 4, 2023, 07:36 PM IST
Patanjali Foods: रामदेव बाबांच्या कंपनीचे शेअर्स गडगडले! गुंतवणूकदारांना 7000 कोटींचं नुकसान title=
Baba Ramdev Patanjali Foods Shares

Baba Ramdev Patanjali Foods Shares Goes Down Investors Lost 7000 Crore: हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) या अमेरिकी शॉर्ट सेलिंग फर्मने जारी केलेल्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याची चर्चा असून शुक्रवार वगळता मागील आठवड्याभरापासून अदानींच्या मालकीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पडझडच सुरु असल्याचं दिसत आहे. अदानी समुहाला बसलेल्या फटक्याची चर्चा असतानाच दुसरीकडे योगगुरु रामदेव बाबांच्या (Baba Ramdev) पतंजली फूड्सच्या (Patanjali Foods) लिस्टेड कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनाही मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

कंपनीच्या एकूण मूल्यात घसरण

मागील आठवड्याभरापासून पतंजली फूड्सच्या शेअर्सचे भाव सातत्याने घसरत आहेत. यामुळे कंपनीत गुंकवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे तब्बल 7000 कोटी रुपयांहून (7000 Crore) अधिक नुकसान झालं आहे. एकीकडे शुक्रवारी अदानी ग्रुपच्या शेअर्सला शुक्रवारी बाजार बंद होण्याआधीच्या शेवटच्या काही तासांमधील व्यवहारांमध्ये फायदा झाल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे त्याच दिवशी पतंजली फूड्सचे शेअर्सला लोअर सर्किट लागलं.

शेअर्सचा भाव किती?

पतंजलीचे शेअर्स 903 रुपये 35 पैशांपर्यंत गडगडले. मात्र व्यवहार बंद झाले त्यावेळेस यामध्ये 45 पैशांची वाढ दिसून आली. बाजार बंद झाला तेव्हा शेअर्सची किंमत 903 रुपये 80 पैसे इतकी होती. असं असलं तरी यंदाच्या संपलेल्या आठवड्याच्या सुरुवातीच्या तुलनेतील दरांचा विचार केल्यास ही घसरण 4.63 टक्क्यांची आहे. या दरावर कंपनीचे मार्केट कॅप म्हणजेच एकूण मार्केट मूल्य हे 32 हजार 825 कोटी 69 लाख इतकं झालं आहे.

नक्की वाचा >> RBI on Adani: देशातील बँकांना Adani Hindenburg प्रकरणाचा बसणार फटका? RBI ने केला खुलासा

आठवडाभरापूर्वी किती होता शेअर्सचा दर?

आठवडाभरापूर्वी पतंजली कंपनीच्या शेअर्सचा भाव हा हजारांच्यावर होता. 27 जानेवारीला पतंजलीच्या शेअर्सचा भाव 1102 रुपये इतका होता. यावेळी कंपनीचं मूल्य 40 हजार कोटी इतकं होतं. म्हणजेच आठवडाभरात कंपनीचं एकूण मूल्य 7000 कोटींहून अधिकने कोसळलं आहे. 

कंपनी नफ्यात...

डिसेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीमध्ये पतंजली फूड्सने आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये कंपनीला 15 टक्क्यांचा नफा झाल्याचं म्हटलं आहे. नफा 15 टक्क्यांनी वाढून 269 कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीसाठी हा नफा 234 कोटी इतका होता. पतंजली फूड्सचा महसूल हा डिसेंबरमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढला. यंदाच्या डिसेंबरमध्ये कंपनीचा महसूल हा 7,929 कोटी इतका होता. वर्षभरापूर्वी हाच आकडा 6280 इतका होता.