पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, कॉलेजचा रावडी आणि आता 700 शूटर्सची फौज; लॉरेन्स बिष्णोई गँगस्टर कसा झाला?

Who is Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद आहे. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल अशी धमकीच लॉरेन्स बिष्णोईने दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 17, 2024, 07:22 PM IST
पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, कॉलेजचा रावडी आणि आता 700 शूटर्सची फौज; लॉरेन्स बिष्णोई गँगस्टर कसा झाला?

Who is Lawrence Bishnoi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली आहे. लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद आहे. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल अशी धमकीच लॉरेन्स बिष्णोईने दिली आहे. सलमान खानचे निकटवर्तीय असल्याने बाबा सिद्दिकींची हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने याआधी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आणि करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची हत्या केली आहे. या टोळीचे देश, परदेशात 700 हून अधिक शूटर्स असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान हा लॉरेन्स बिष्णोई नेमका आहे कोण? हे जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

लॉरेन्स बिष्णोईचा जन्म पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात झाला. त्याचे वडील हरियाणा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर  होते. पण नंतर त्यांनी पोलीस खात्यातील नोकरी सोडून शेती सुरु केली. लॉरेन्सने अबोहर जिल्ह्यात 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं. पुढील शिक्षण त्याने चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमधून पूर्ण केलं. येथे त्याला राजकारणात रस वाटू लागला आणि विद्यार्थी राजकारणात सहभागी झाला. 

'गोल्डी बराडशी मैत्री'

याचवेळी लॉरेन्स बिष्णोईची गोल्डी बराडशी मैत्री झाली. जेव्हा लॉरेन्स विद्यार्थी राजकारणात सहभागी झाला तेव्हाच गोल्डी बराड पंजाब विद्यापीठात शिकत होता. दोघेही एकत्र विद्यार्थी राजकारणात उतरले. पण एकमेकांच्या गटाशी होत असलेल्या संघर्षामुळे गुन्हेगारीच्या जगात आले. तोपर्यंत लॉरेन्सने एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्याच्यावर हल्ला, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासह अनेक गुन्हे दाखल झाले होते. यातील काही प्रकरणात लॉरेन्सची सुटका झाली आहे. मात्र काही प्रकरणात अद्यापही केस सुरु आहे. 

जेलमधून करण्यात आला टोळीचा विस्तार

या प्रकरणांमध्ये अटक करत लॉरेन्सची जेलमध्ये रवानगी करण्यात आली. पण जेलमध्ये जाणं लॉरेन्सच्या फायद्याचंच ठरलं. जो काम तो जेलच्या बाहेरुन करु शकत नव्हता, ती त्याने जेलच्या आतून केली. जेलच्या आत गेल्यानंतर तो अनेक गँगस्टर्सच्या संपर्कात आला आणि त्याने त्यांच्या माध्यमातून आपल्या गँगचा विस्तार केला. याचवेळी तो शस्त्रांची डील करणाऱ्यांच्याही संपर्कात आला. असं सांगतात की, फक्त आपली दहशत निर्माण करण्याच्या हेतूने त्याने लुधियाना पालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची हत्या केली. राजस्थान पोलिसांनी 2014 मध्ये त्याला अटक केली. 

2021 मध्ये तिहार जेलमध्ये केलं शिफ्ट

लॉरेन्सने गँगस्टपासून नेता झालेल्या जसविंदर सिंह उर्फ रॉकीशी मैत्री केली. 2016 मध्ये जयपाल भुल्लर नावाच्या एका गँगस्टरने रॉकीची हत्या घडवली. याला बदला घेत लॉरेन्सने 2020 मध्ये भुल्लरची हत्या केली. 2021 मध्ये लॉरेन्सला मकोका अंतर्गत एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी राजस्थानच्या भरतपूर पासून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. 

लॉरेन्स बिष्णोईची गँग पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआरमध्ये सक्रीय आहे. ही गँग विशेषत: अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी, सुपारी हत्या आणि इतर संघटित गुन्ह्यांशी संबंधित आहेत. बिष्णोई टोळी व्यापारी, बिल्डर आणि इतर प्रमुख व्यक्तींकडून खंडणीसाठी कुख्यात आहे. या टोळीतील सदस्यांनी अनेक व्यावसायिक आणि सेलिब्रिटींना वारंवार धमक्या दिल्या आहेत. या टोळीचे नाव अनेक खून आणि खुनाच्या प्रयत्नात समोर आले आहे. सुपारी देऊन हत्या करण्यातही बिष्णोई टोळीचा हात आहे. या टोळीचा पंजाब आणि राजस्थानसारख्या राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीत मोठा हात आहे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More