मध्य प्रदेश हायकोर्टाच्या (Madhya Pradesh High Court) जबलपूर खंडपीठाने (Jabalpur Bench) देशविरोधी घोषणा देणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर केला आहे. पण यावेळी त्याला एक अट घालण्यात आली. कोर्टाने त्याला तिरंग्याला 21 वेळा सलाम करत 'भारत माता की जय' घोषणा देण्यास सांगितलं आहे. कोर्टाने त्याला महिन्यातून दोन वेळा हे काम करण्यास सांगितलं आहे.
आरोपी फैजल खान उर्फ फैजानच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती दिनेश कुमल पालीवाल म्हणाले, “या खटल्याची सुनावणी सुरू असेपर्यंत आरोपीला (फैजल खान) भोपाळमधील मिसरोड पोलीस स्टेशनला महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी भेट द्यावी लागेल आणि पोलीस स्टेशनच्या इमारतीवर असलेल्या राष्ट्रध्वजाला सलाम करावा लागेल".
न्यायमूर्ती पालीवाल यांनी फैजल खानला 21 वेळा ‘भारत माता की जय’ ही घोषणा द्यावी लागेल, असा आदेशही दिला. "जामिनाच्या कागदपत्रांमध्ये वरील अट समाविष्ट करणे आवश्यक आहे. Cr.P.C च्या कलम 437(3) अन्वये नोंदवलेल्या सर्व अटींचे पालनही तो करील,” असे न्यायालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, न्यायालयाने भोपाळ पोलीस आयुक्तांनाही जामिनासाठी या अटीचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, रायसेन जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या फैजल खानला यावर्षी मे महिन्यात मध्य प्रदेशने भोपाळमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद' अशा देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी अटक केली होती. फैजलने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आणि दावा केला की आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. तथापि, सुनावणीदरम्यान, त्यांच्या वकिलाने मान्य केले की त्यांचा आशिल देशविरोधी घोषणा देताना दिसला. त्यामुळे काही कडक अटी घालून त्यांची जामिनावर सुटका करावी, अशी विनंती वकिलाने केली.
फिर्यादीच्या वकिलांनी जामीन अर्जाला विरोध करताना तो नेहमीचा गुन्हेगार असून त्याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत असा युक्तिवाद केला. वकिलांनी सांगितलं की, व्हिडिओमध्ये तो ज्या देशामध्ये जन्मला आणि वाढला त्या देशाविरोधात उघडपणे घोषणाबाजी करताना दिसतो.
युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पालीवाल यांनी नमूद केलं की, निःसंशयपणे अर्जदाराची 13 गुन्हेगारी प्रकरणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि व्हिडिओमध्ये तो वर नमूद केल्याप्रमाणे घोषणाबाजी करताना दिसत आहे. न्यायमूर्ती पालीवाल म्हणाले, "माझ्या मते अर्जदाराला काही अटी लादून जामिनावर सोडले जाऊ शकते ज्यामुळे त्याच्यामध्ये जबाबदारीची भावना आणि तो ज्या देशात जन्मला आणि जगला त्या देशासाठी अभिमान वाटेल".