Bagehswar Baba: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा येथे बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांचा दिव्य दरबार भरला आहे. 'अमृत कल्याण सेवा ट्रस्ट'ने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 16 जुलैपर्यंत हा कार्यक्रम सुरु असणार आहे. यावेळी त्यांनी 'आज तक'शी बोलताना, मंदिरांमध्ये जाऊन रील्स करणाऱ्यांना सल्ला दिला आहे. चित्र नाही, चरित्रासाठी मंदिरात जावा असं त्यांनी सांगितलं आहे.
सध्या रील्सचा ट्रेंड आहे. काही लोक तर कधीही आणि कुठेही रील्स शूट करण्यास सुरुवात करतात. इतकंच काय तर आता त्यांनी मंदिरंही सोडलेली नाहीत. रोज अशा अनेक रिल्स पाहण्यात येतात. यामधील सर्वाधिक रील्स केदारनाथ (Kedarnath) मंदिरात केल्या जातात. यावरन आता धीरेंद्र शास्त्री यांनी मंदिरात जाऊन रील्स शूट करणाऱ्यांना सल्ला दिला आहे.
"मदिरं, देऊळं, तीर्थस्थळ हा प्रदर्शनाचा नव्हे तर दर्शनाचा विषय आहे. येथे फोटो काढत जाऊ नका. देवाचं चरित्र जाणून घ्या. मंदिर माणसाचं चित्र नाही तर चरित्रासाठी ओळखलं जातं. त्यामुळे श्रद्धाळूंनी मंदिरात जावं. पण आस्थेसाठी, रिलसाठी नाही," असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी मला ना ब्रांड व्हायचं आहे, ना पोस्टर बॉय असंही सांगितलं. मला सुरुवातीपासून एक शिपाईच व्हायचं होतं. आता माझं लक्ष्य सनातन, सनातनी जागरुकता आणि सनातनी हिंदूंची एकता आहे असं ते म्हणाले.
चित्रपटांमध्ये धर्माचा अपमान करण्यावरुन होणाऱ्या वादांवरही धीरेंद्र शास्त्री यांनी भाष्य केलं. ते म्हणाले "चित्रपट आपल्या आयुष्यावर फार मोठ्या काळासाठी छाप सोडतात. जर एखाद्या चित्रपटात धर्माच्या विरोधात काही दाखवलं जात असेल तर त्याचा विरोध करणं चुकीचं नाही. संतोषी मां वर आलेल्या चित्रपटाचंच उदाहरण घ्या. ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा लोकांवर त्याचा इतका परिणाम झाला की शुक्रवारी टोमॅटो खरेदी करणंच बंद केलं होतं. ".