बालाकोटच्या तळावर पाकिस्तानकडून पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव- लष्करप्रमुख

भारताच्या मिराज विमानांच्या ताफ्याने या तळावर तब्बल १००० किलो स्फोटकांचा वर्षाव केला होता.

Updated: Sep 23, 2019, 12:21 PM IST
बालाकोटच्या तळावर पाकिस्तानकडून पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव- लष्करप्रमुख title=

नवी दिल्ली: भारतीय वायूदलाच्या एअरस्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त झालेल्या बालाकोटमध्ये पाकिस्तानने पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव सुरु केल्याचे समोर आले आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, बालाकोटचा दहशतवादी तळ पाकिस्तानकडून पुन्हा कार्यरत करण्यात आला आहे. 

यावरून एक बाब स्पष्ट होते की, भारतीय वायूदलाच्या एअरस्ट्राईकमध्ये या तळाचे नुकसान झाले होते. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर हानी झाली होती. मात्र, आता याठिकाणी पुन्हा लोकांची जमवाजमव सुरु झाल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले. 

फेब्रुवारी महिन्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांना पुलवामा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. यामध्ये ४४ भारतीय जवान शहीद झाले होते. 

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केला होता. भारताच्या मिराज विमानांच्या ताफ्याने या तळावर तब्बल १००० किलो स्फोटकांचा वर्षाव केला होता. यामध्ये २०० ते ३०० दहशतवाही ठार झाल्याचे सांगितले जाते. 

बालाकोटमधला जैशचा सर्वात मोठा दहशतवादी तळ हा मौलाना युसूफ अजहर उर्फ उस्ताद घोरी हा चालवत होता. या हल्ल्यात हा तळ संपूर्ण नष्ट झाला असून यात जैशचे दहशतवादी, म्होरके, कमांडर्स, ट्रेनर्सही ठार झाले होते. मात्र, पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कांगावा करत असा कोणताही हल्ला झालाच नसल्याचे म्हटले होते. मात्र, भारताने अनेक पुरावे सादर करून पाकिस्तानला चांगलेच तोंडघशी पाडले होते.