सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग चिदंबरम यांच्या भेटीसाठी तिहार तुरुंगात?

चिदंबरम यांना झालेली अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता.

Updated: Sep 23, 2019, 09:08 AM IST
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग चिदंबरम यांच्या भेटीसाठी तिहार तुरुंगात? title=

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या भेटीला जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सोमवारी तिहार तुरुंगात जाणार असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २१ ऑगस्ट रोजी पी. चिदंबरम यांना अटक केली होती. यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या काळात पी. चिदंबरम यांनी जामीनासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ दिली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

तिहार जेलमध्ये पी. चिदंबरम यांना मिळणार 'या' सुविधा

सध्या त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. चिदंबरम यांना झालेली अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता. यानंतर पक्षाकडून सातत्याने त्यांची पाठराखण केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग त्यांची आज भेट घेणार असल्याचे कळते. साधारण साडेनऊच्या सुमारास हे दोन्ही नेते तिहार तुरुंगात येतील असा अंदाज आहे.