Bangladesh PM Sheikh hasina : बांगलादेशमध्ये माजलेल्या अराजकतेनं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधलेलं असतानाच आता या देशातील घडामोडींची चर्चा भारतातही वेग धरू लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशात सुरू असणाऱ्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देत देशातून काढता पाय घेतला आणि या आंदोलनाचा आणखी गंभीर वळण प्राप्त झालं.
बांगलादेश धुमसत असतानाच संपूर्ण जगातून या देशातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवत राजकीय विश्लेषक आणि जाणकारांनी आपल्या प्रतिक्रिया देत या घटनेची उकल करण्यास सुरुवात केली. भारतातही अनेकांनीच बांगलादेशमधील गंभीर स्थितीविषयी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं, अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतही इथं मागे राहिली नाही. कंगनानं X च्या माध्यमातून राम राज्याचा उल्लेख करत बांगलादेशमधील अराजकतेवर प्रतिक्रिया दिली.
कंगनानं बांगलादेशमधील हिंसक आंदोलनं आणि शेख हसीना यांचं भारतात येणं या सर्व घटनांना अनुसरून एक पोस्ट लिहिली. जिथं ती म्हणाली, 'भारतभूमी आजुबाजूच्या इस्लामबहुल प्रजासत्ताक राष्ट्रांची मूळ मातृभूमी आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात सुरक्षित वाटतं हा आमचा बहुमान आहे. पण, भारताच राहून हिंदू राष्ट्र का? कशासाठी हवंय राम राज्य? असं विचारणाऱ्यांनो.... हा आहे त्याचा पुरावा, यासाठीच हवंय राम राज्य.
मुस्लिम राष्ट्रांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लिम समुदायातील नागरिकसुद्धा. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही सुरू आहे ते दुर्दैवीच आहे. राम राज्यात वास्तव्यास असणारे आम्ही नशिबवान आहोत. जय श्री राम!!!'
कंगनानं ही पोस्ट करताच सोशल मीडियावर त्यावर अनेकांनी संमिश्र सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्रीची भूमिका अनेकांना पटली, तर काहींनी तिचा खरपूर समाचार घेत बांगलादेशमधील परिस्थितीकडे पुन्हा सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आता येत्या काळात बांगलादेशमधील स्थिती नेमकी कधी नियंत्रणात येते आणि तिथं नेमके कोणते फेरबदल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.