मुंबई : तुमची बँकेची कामं राहिली असतील, तर ती उद्याच्या उद्या नक्की आटपून घ्या. कारण शुक्रवारनंतर आता बँक थेट बुधवारी उघडली जाणार आहे.
तसं मोबाईल बँक असल्याने आणि हल्ली बरचसे व्यवहार ऑनलाईनच होत असल्यानं बँकेत जाण्याची फारशी गरज भासत नाही. मात्र तरीही काही कामं अशी आहेत, ज्यासाठी तुम्हाला बँकेतच जावं लागू शकतं. 13 ते 17 मार्च बँक विविध कारणांसाठी बंद असणार आहेत.
दिवस बँक बदचं कारण
13 मार्च महिन्याचा दुसरा शनिवार
14 मार्च रविवार
15 मार्च बँक कर्मचाऱ्यांचं संप
16 मार्च बँक कर्मचाऱ्यांचं संप
15 आणि 16 मार्चला केवळ सरकारी आणि ग्रामीण बँका बंद असणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या (UFBU) नेतृत्वाखाली हा संप करण्यात येणार आहे. विविध 9 बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांचे सदस्य या संपात सहभागी होतील.
बँकांच्या खाजगीकरणाविरोधात सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी हा 2 दिवसीय संप पुकारला आहे. कोणत्याही सरकारी बँकेला खाजगी मालकाच्या स्वाधीन करू नये, अशी मागणी या सरकारी बँक कर्मचाऱ्यांची आहे. यामुळे सरकारी बँक कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येण्याची भीतीही कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे.
दुसरीकडे केंद्र सरकारचा दावा आहे की काही सरकारी संस्थांना चालवण्यासाठी त्यांचं खाजगीकरण गरजेचं आहे. जर त्यांचं खाजगीकरण झालं नाही, तर कर्मचाऱ्यांचा पगार देणंही मुश्किल होऊन बसेल.
ज्या 4 बँकांच्या खाजगीकरणाची चर्चा सुरू आहे, त्यांचे मिळून 1 लाखाहून अधिक कर्मचारी आहेत. सरकारचा दावा आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याची नोकरी धोक्यात येणार नाही.