बाबो! HDFC बँकेच्या सीईओंना 'इतक्या' कोटींचं वार्षिक पॅकेज, देशात सर्वात जास्त पगार घेणारे बँकर्स

देशात सर्वात जास्त पगार घेणाऱ्या यादीत HDFC बँकेचे सीईओ अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. शशिधर जगदीशन असं त्यांचं नाव असून त्यांचा वार्षिक पगार हा कोट्यवधी रुपयात आहेत. या सर्वात एक बँकर्स असा आहे ज्यांनी केवळ एक रुपया वेतन घेतलं आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 7, 2023, 03:38 PM IST
बाबो! HDFC बँकेच्या सीईओंना 'इतक्या' कोटींचं वार्षिक पॅकेज, देशात सर्वात जास्त पगार घेणारे बँकर्स title=

Highest Paid Banker in 2023 : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांचे वार्षिक पॅकेज 15 कोटी रुपये इतकं आहे. पण तुम्हाला माहित आहे का देशातील सर्वाधिक पगार घेणारे बँकर्स कोण आहेत. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO शशिधर जगदीशन (Sashidhar Jagdishan) हे आर्थिक वर्षात (2022-23) सर्वाधिक पगार घेणारे बँकर ठरले आहेच. त्यांना तब्बल 10.55 कोटींचं वार्षिक पॅकेज देण्यात आलं आहे. याशिवाय, शशिधर जगदीशन यांचे सहकारी आणि एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक कैजाद भरुचा यांना गेल्या आर्थिक वर्षात 10 कोटी वार्षिक पगाल देण्यात आला आहे. त्यामुळे ते देशातील सर्वात जास्त पैसे देणारे दुसरे बँकर आहेत.

शशिधर जगदीशन यांचा एकूण वार्षिक पगार 10.55 कोटी रुपये इतका आहे. यात 2.82 कोटी बेसिक पगार, 3.31 कोटी रुपयांचे भत्ते, 33.92 लाख रुपयांचे पीएफ आणि 3.63 कोटी रुपयांचे परफॉर्मन्स बोनस यांचा समावेश आहे. सर्वाधिक पगार घेणाऱ्या बँकर्सच्या यादीत अॅक्सिस बँकेचे (Axis Bank) अमिताभ चौधरी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा वार्षिक पगार  9.75 कोटी इतका आहे. त्यांच्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) संदीप बक्षी यांना 9.60 कोटी रुपये पगार मिळतो.

उदय कोटक यांनी घेतला 1 रुपया पगार
यात एक असेही सीईओ आहेत ज्यांनी फक्त एक रुपया वार्षिक पगार घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकचे CEO उदय कोटक यांनी केवळ एक रुपया पगार घेतला आहे. उदय कोटक यांची कोटक महिंद्रा बँकेत 26 टक्के भागिदारी आहे. कोवि19 नंतर त्यांनी केवळ एक रुपया वेतन घेण्याचा निर्णय घेतला होता. 2022-23 वर्षातही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. 1985 साली कोटक महिंद्रा बँकेच्या स्थापनेपासून उदय कोटक बँकेचे सीईओ आहेत. 

बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ
उदय कोटक एक रुपया पगार घेत असले तरी कोटक महिंद्रा बँक कर्मचाऱ्यांच्या पगार चांगली वाढ झाली आहे. बँकेने व्यवस्थापकीय कर्मचारी वगळून कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारात 16.97 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचवेळी ICICI बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर अॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 7.6 टक्के वाढ झाली आहे.  HDFC बँकेने कर्मचाऱ्यांच्या पगारात 2.51 टक्क्यांनी वाढ केली आहे.