मुंबई : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातला वाद साऱ्या जगाला ठाऊक आहे. या वादाला सर्वात मोठी किनार आहे ती जम्मू-काश्मीरची. (Jammu and Kashmir) पण आता त्यात बासमती तांदळाचीही भर पडलीय. बासमती तांदूळ (Basmati rice) नेमका कुणाचा यावरून दोन्ही देशांमध्ये वाद पेटलाय. नेमका काय आहे हा प्रकार. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट
आतापर्यंत सीमेवर एकमेकांविरोधात लढणाऱ्या भारत-पाकिस्तानमधला वाद आता बासमती तांदळापर्यंत जाऊन पोहोचलाय. त्याला कारण ठरलं भारतानं बासमती तांदळासाठी युरोपियन युनियनकडे केलेला अर्ज...बासमती तांदळासाठी प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच PGI मानांकनाला परवानगी द्यावी अशी मागणी भारतानं केली. त्यामुळे बासमती तांदळाबाबतचे अधिकृत अधिकार भारताला मिळणार आहेत. पण त्यातही पाकिस्ताननं कुरघोडी केलीय. बासमती तांदळावर पाकिस्ताननेही आपला दावा केला आहे.
युरोपियन देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाची निर्यात होते. त्यातून भारताला 6.8 अब्ज डॉलर्सचा लाभ मिळतो. तर पाकिस्तानला 2.2 अब्ज डॉलर्स मिळतात. मात्र भारताला युरोपियन देशांकडून PGI मानांकन मिळाल्यास आपल्याला आर्थिक फटका बसेल अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे.ज्या बासमती तांदळावरुन पाकिस्तानचा तीळपापड झालाय. त्या तांदळाची उत्पत्ती नेमकी कुठे आणि कशी झाली हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे.
बासमती या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधल्या बस आणि मती या दोन शब्दातून झालीय. बासमतीला सुगंधाची राणी असं संबोधण्यात आले आहे. सुरूवातीला भारतात हिमालायतल्या तराई भागात बासमती तांदळाचे उत्पादन घेतलं जातं होतं. सध्याच्या घडीला हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्येही मोठ्या प्रमाणात या तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. प्राचीन भारतात बासमती तांदूळ उत्पादित केला जात असल्याचे अनेक दाखले आहेत.
त्यामुळे पाकिस्ताननने केलेल्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट होतंय. केवळ भारताला PGI नामांकन मिळू नये म्हणून पाकिस्तानला पोटदुखी झाली आहे. हेच त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे.