दक्षिण आफ्रिका : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना ओमायक्रॉनची बाधा होणार नाही या भ्रमात आपण आहात तर आपल्या भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण, Omicron ची नवी लक्षणे समोर आली आहेत. ही माहिती दिली आहे दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाचे जनरल प्रॅक्टिशनर डॉ. अनबेन पिल्ले यांनी...
ओमायक्रॉनचा (Omicron) पहिला विषाणू दक्षिण आफ्रिकेत सापडला. तेथून हा विषाणू झपाट्याने जगभरात पसरला. ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा आटोक्यात आलेली कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली. एका आठवड्यात जगभरात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ओमायक्रॉनमुळे उद्भवलेल्या धोक्याचे वर्णन 'खूप उच्च' असे केले आहे. अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या प्रकरणामागे ओमायक्रॉन हे कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. या विषाणूने डेल्टालाही मागे टाकले आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचा ओमायक्रॉन विषाणू दोन ते तीन दिवसांत संसर्गाची प्रकरणे दुप्पट करत आहेत.
भारतातही ओमायक्रॉन रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील ओमायक्रॉन रुग्णांनी 780 चा टप्पा ओलांडला आहे. तर, देशात कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण 77,002 आहेत. ओमायक्रॉनचा धसका घेतल्याने देशातील अनेक राज्यांनी निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे.
त्यातच ओमायक्रॉनची नवीन लक्षणेही दररोज समोर येत आहेत. ही लक्षणे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांमध्येही दिसून आली आहेत. ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांना घसा दुखीचा त्रास जाणवतो. काहींना रात्री खूप घाम येतंय. तर, काहींना शरीरात तीव्र वेदना जाणवतात. सर्वसामान्यतः ही लक्षणे असल्यास लगेच चाचणी करण्याचा सल्ला डॉ. अनबेन पिल्ले यांनी दिला आहे. Omicron चे हे असामान्य लक्षण असून याचा चाचणीशिवाय अंदाज लावणे अशक्य असल्याचेही ते म्हणाले.