मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कॅप्टन यांनी सोनिया गांधींना लिहिलं होतं पत्र

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं.

Updated: Sep 19, 2021, 04:15 PM IST
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कॅप्टन यांनी सोनिया गांधींना लिहिलं होतं पत्र

चंदीगढ : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी पत्रात, त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी केल्या आणि त्याचप्रमाणे कोणत्याही अटी न ठेवता बॉर्डरच्या जवळंच राज्य सांभाळलं असल्याचं म्हटलंय. 

पंजाबची अंतर्गत सुरक्षा हाताळली - कॅप्टन

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे की, "या निर्णयामुळे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी आशा आहे. आशा आहे की माझे प्रयत्न चालू राहतील. धार्मिक ग्रंथातून अपवित्र केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली. पंजाबची अंतर्गत सुरक्षा हाताळली. राज्यात शांतता, जातीय सलोखा राहिला. पंजाबमध्ये कोणाविरुद्ध भेदभाव नव्हता."

भाजपचा काँग्रेसवर हल्ला

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यावर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, अमरिंदर सिंग हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय झाले होते, म्हणूनच त्यांना हटवण्यात आलं.

सिद्धू यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

भाजप खासदार प्रकाश जावडेकर म्हणाले की, "अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सिद्धू पाकिस्तानात गेलs आणि बाजवाला मिठी मारली, असे सांगून त्यांनी सिद्धूला देशद्रोही म्हटलं आहे. हा मुद्दा आधीपासून होता आणि काल अमरिंदर यांनी तो स्पष्ट केला आहे. आमचा प्रश्न सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आहे, तुम्ही गप्प का? काँग्रेस पक्ष काही कारवाई करणार आहे का?"