Covid-19: देशात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतोय. कोरोना व्हायरस आणि त्याच्या संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येतंय. नुकतंच कोरोनाचा एक नवा उप प्रकार भारतात आढळला होता. या नव्या उप प्रकाराचं नाव JN.1 असं असून याचं पहिलं प्रकरण केरळमध्ये नोंदवण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशातच एका कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीने चिंता अधिक वाढली आहे.
या दोन घटना समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर आलं आहे. यावेळी राज्यांमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये नियमित व्यायाम म्हणून मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. केरळमध्ये कोरोनाच्या भीतीनंतर आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी तातडीची बैठक बोलावली असून अधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आलंय.
आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले की, आम्हाला रूग्णालयामध्ये मॉक ड्रिल करावं लागणार आहे. आम्ही मास्क, ऑक्सिजन सिलेंडर इत्यादींची तयारी केली आहे.
केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पनूर नगरपालिकेतील प्रभाग-1 निवली या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. आता या घटनेनंतर, परिसरात कोविड विरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांवर अधिक भर देण्यात येतोय. 80 वर्षाच्या या मृत व्यक्तींला खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
सिंगापूरमधील एका भारतीय व्यक्तीला कोरोनाच्या JN.1 उप-प्रकाराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा व्यक्ती मूळचा तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबर रोजी तो सिंगापूरला गेला होता. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात तसेच तामिळनाडूमधील इतर ठिकाणी JN.1 च्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. मात्र, अशा रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.