BH Series Number Plate: गाडीच्या नवीन नंबर प्लेटबद्दल जाणून घ्या, कोण करु शकतं अर्ज

BH Series म्हणजे काय, याचा फायदा कोणाला, त्यासाठी किती पैसे भरावे लागतील, जाणून घ्या सर्व काही

Updated: Mar 12, 2022, 09:15 PM IST
BH Series Number Plate: गाडीच्या नवीन नंबर प्लेटबद्दल जाणून घ्या,  कोण करु शकतं अर्ज title=

BH Series Number Plate : नोकरीनिमित्त सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागतं. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे राज्य बदलल्यानंतर पुन्हा वाहन नोंदणीची समस्या. भारत सरकारने अखेर ही समस्या सोडवली आहे. आता बीएच सीरीज नंबर प्लेट आणि नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही.

कोणत्या लोकांसाठी प्राधान्य?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही मालिका अशा लोकांसाठी सुरू केली आहे, ज्यांची नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदली होते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विशेषत: संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यामध्ये विशेष प्राधान्य दिले गेलं आहे.

आजच्या काळात कामामुळे लोकांना अनेकदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागते. अशा परिस्थितीत, नवीन राज्यात पोहोचल्यावर, आपल्या वाहनाची नवीन नोंदणी करणे खूप डोकेदुखी आहे. आता या त्रासातून लोकांना दिलासा मिळाला आहे.

किती अतिरिक्त शुल्क भरावं लागणार?
या नवीन सीरिजमध्ये 10  लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 8 टक्के शुल्क भरून बीएच सीरिजचा क्रमांक मिळवता येईल. जर वाहनाची किंमत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत असेल तर या सीरिजवरवर 10 टक्के दराने शुल्क आकारलं जाईल. बीएच सीरीजसाठी, वाहनाची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 12 टक्के शुल्क भरावे लागेल.

एक भारत, एक टॅक्स, एक नंबर प्लेट
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे कर्मचारीही या BH-Series चा लाभ घेऊ शकतील. 4 किंवा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात. या मालिकेचा फॉरमॅट अशा प्रकारे असेल, नंबर प्लेटवर पहिले वर्ष लिहिलं जाईल. यानंतर भारत म्हणून BH लिहिलं असेल आणि त्यानंतर वाहन क्रमांक असेल.

बीएच सीरिजची खास गोष्ट म्हणजे या सीरिजचं वाहन भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणत्या अडथळ्याशिवाय जाऊ शकतं. नवीन ठिकाणी बदली करताना किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी नवीन नोंदणी किंवा एनओसी आवश्यक नाही. सध्याच्या नंबर प्लेटनुसार वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जायचं असल्यास एनओसी घेऊन नवीन नोंदणी करावी लागते.

BH नंबर प्लेट समजून घ्या
BH नंबर प्लेट नेहमीच्या नंबर प्लेट सारखीच आहे.  पांढऱ्या पट्टीवर काळी अक्षरं आहेत, पण आताच्या नंबर प्लेटच्या नेमकी उलट ही नंबर प्लेट आहे. म्हणजे ज्या वर्षात तुम्ही वाहन घ्याल ते वर्ष (उदा. आताचं वर्ष 22), त्यानंतर 'BH' म्हणजे भारत, त्यानतंर वाहन क्रमांक आणि 'A' म्हणजे वाहन श्रेणी. उदा. 22 BH 0756 A (वर्ष, भारत, वाहन क्रमांक, श्रेणी)

BH नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करावा?
बीएच नंबर प्लेट मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. नवीन वाहन खरेदी करताना, ग्राहक डीलर वाहन पोर्टलद्वारे BH नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकतो.