तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांची आज 'भारत बंद'ची हाक

ऐच्छिक रीतीने व शांततेने हा बंद पाळला जाईल

Updated: Sep 27, 2021, 08:03 AM IST
तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांची आज 'भारत बंद'ची हाक

मुंबई : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांची आज 'भारत बंद'ची हाक पुकारण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार आहे. केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) आज, सोमवारी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असून, काही राज्यांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना हा ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. सकाळी ६ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत पाळल्या जाणाऱ्या बंददरम्यान देशभरातील सर्व सरकारी व खासगी कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील, तसेच सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. तथापि, रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील.

ऐच्छिक रीतीने व शांततेने हा बंद पाळला जाईल, अशी हमी संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. अनेक राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी बंदला पाठिंबा असल्याचे सांगितले. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते, राजद नेते तेजस्वी यादव यांनी आपण या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.

दिल्लीच्या बाजूने येणारी सर्व वाहतूक महाराजपूर, सीमापुरी, तुळशी निकेतन मार्गे पुढे जाईल. लोनी सीमेवरून दिल्लीच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक लोणी तिराहा, तिला मोर, भोपुरा मार्गे दिल्लीच्या दिशेने वळवली जाईल.