नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार - कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. त्याचा बँक, वाहतूक आणि अन्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. इंटक, आयटक, एचएमएस, सिटू यांच्यासह विविध संघटनांनी हा संप पुकारलाय. २ जानेवारी २०२० रोजी झालेल्या बैठकीत कामगार मंत्रालयानं एकाही मागणीबाबत आश्वासन दिलेलं नाही. १० कामगार संघटनांनी एका संयुक्त निवेदनामध्ये म्हटलंय. या संपामध्ये राज्य सरकारी रुगणालयांमधले तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. परिचारिकांसह तंत्रज्ञ आणि साफसफाई कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयातली सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
सरकारी रुग्णालयांसह जेजे, जीटी, कामा, सेंट जॉर्ज रुग्णालयातले तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी देखील संपावर आहेत. संपाला रेल्वे, एसटी कामगार आणि बेस्ट संघटनांनी पाठिंबा दिलाय. मात्र संपात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मुंबई उपनगरी रेल्वे, बेस्ट आणि राज्यातील एसटी सेवा सुरळीत राहणार आहे. देशव्यापी कर्मचारी बंदला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवलाय. काँग्रेस, राष्ट्रवादी देखील या संपात सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात पुकारलेल्या भारत बंदचा मुंबईवर फारसा परिणाम झालेला नाही. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. मुंबईकर चाकरमानी नेहमीप्रमाणे सकाळी कामावर निघाल्याचं चित्र आहे. विद्यार्थी शाळा कॉलेजला निघालेले पाहायला मिळत आहेत. मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकल आणि बेस्ट सेवा सुरळीत आहे. रेल्वे स्थानकात लोकल प्रवाशांनी भरून येत आहेत. तर रस्त्यावर बेस्ट, रिक्षा, टॅक्सी सुरळीत सुरू आहेत. तर बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. तर सरकारी रुग्णालायाच्या सेवांवर काहीअंशी परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी खबरदारी म्हणून मुंबईत अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
आजच्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या बंदचा नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम झालेला नाही. आतापर्यंत ६५० भाजीपाला गाड्यांची आवक झालीय. ट्रान्सपोर्टर त्याचबरोबर माथाडी संघटनांनी बंदला पाठिंबा न दिल्यानं एपीएमसीमधील पाचही मार्केटवर संपाचा परिणाम होणार नाही.