वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.
शनिवारी बिघडलेली परिस्थिती पाहता विद्यापीठ २ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा आटोपल्यानंतर विद्यापीठ आवारात हिंसाचार भडकलाय. मुलांच्या वसतिगृहात पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली... तसंच पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आलेत.
'व्हीसी लॉज'जवळ पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. यांत अनेक विद्यार्थी जखमी झाले. यानंतर विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका उडाला आणि हिंसाचार भडकला. विद्यार्थिनींनी छेडछाडीविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला हे विद्यार्थी पाठिंबा देत आहेत.
विद्यार्थीनींनी केलेल्या आरोपानुसार, बीएफएच्या तिसऱ्या वर्षाला असणारी विद्यार्थीनी सायंकाळी ७ वाजल्याच्या सुमारास त्रिवेणी कॉम्प्लेक्स स्थित आपल्या हॉस्टेलवर परतत असताना दोन बाईकस्वारांनी तिच्यासोबत छेडछाड केली. तिनं विरोध केल्यावर अपशब्द उच्चारत ते तिथून पळाले.
या घटनेची तिनं जेव्हा तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा युनिव्हर्सिटीनं दिलेलं उत्तर धक्कादायक होतं... सायंकाळी बाहेर जायची गरजच काय होती? असा उलट प्रश्न तिला विचारला गेला. यानंतर युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी - विद्यार्थीनींनी आंदोलन सुरू केलंय.
पीडित विद्यार्थीनीनं या घटनेला विरोध दर्शवताना आपलं मुंडण केलंय. विद्यार्थीनींच्या म्हणण्यानुसार, छेडछाडीच्या घटना या दररोजच्या झाल्यात. तक्रारीनंतरही या गुंडांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही... म्हणून त्यांना आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागलाय.