कोलकाता : तृणमूल कॉंग्रेस (TMC) ला पश्चिम बंगाल निवडणुकी (West Bengal election 2021) आधी गळती सुरुच आहे. आज तृणमुल काँग्रेसला आणखी ५ मोठे धक्के बसले आहेत. सुवेंदू अधिकारी आणि दिनेश त्रिवेदी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सोमवारी टीएमसीच्या 5 आमदारांनी एकत्र येऊन पक्षाला निरोप दिला. त्याचवेळी मालदा जिल्हा परिषद ही तृणमूल कॉंग्रेसकडून भाजपाच्या ताब्यात गेली आहे.
चार वेळा आमदार आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची अनेक दशकांची निकटच्या सहकारी सोनाली गुहा आणि सिंगूर चळवळीचा प्रमुख चेहरा असलेले रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना निवडणुकीत तिकीट न दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
5 मार्च रोजी जाहीर झालेल्या टीएमसीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये नाव नसलेल्या चार वेळा आमदार राहिलेले जटू लाहिरी आणि पहिल्यांदाच आमदार बनलेले माजी फुटबॉलर दिपेन्दू विश्वास यांनीही पक्ष बदलला.
शुभेंदू अधिकारी आणि मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. तृणमूलचे आणखी एक आमदार शीतल सरदार यांनी ही भाजपमध्ये प्रवेश केला.
Kolkata: TMC MLAs Sonali Guha, Dipendu Biswas, Rabindranath Bhattacharya, Jatu Lahiri and TMC candidate from Habibpur Sarala Murmu join BJP in presence of West Bengal party president Dilip Ghosh, BJP leaders Suvendu Adhikari & Mukul Roy #WestBengalElections2021 pic.twitter.com/4AtGAHa6H7
— ANI (@ANI) March 8, 2021
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मालदा जिल्ह्यातील हबीबपूर मतदारसंघातून टीएमसीची उमेदवारी न मिळाल्याने सरला मुर्मू यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काही तासांपूर्वी 'तब्येत बिघडल्या'मुळे त्याच्या जागी दुसर्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली होती. पण सरला मुर्मू यांना हवा असलेला मतदारसंघ न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडल्याची चर्चा आहे. पक्षाने सकाळी प्रदीप बास्की यांच्या नावाची घोषणा त्यांच्या जागी केली.
22 सदस्यांनी पक्ष बदलल्याने भाजपने मालदा जिल्हा परिषदही ताब्यात घेतली. दरम्यान, बांग्ला अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात टीएमसीमधून नेते प्रवेश करत आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल दरम्यान आठ टप्प्यात घेण्यात येणार आहेत. 2 मे रोजी मतमोजणी होईल.