Chinese Female Spy: बापरे! चीनच्या महिला गुप्तहेराला पकडण्याचा थरार चित्रपटाहून कमी नाही, पाहा

तिनं जो वेश धारण केला होता, ते पाहून कोणालाच तिळमात्र संशय आला नाही की ती नेमकं काय काम करतेय. पाहा सविस्तर वृत्त 

Updated: Oct 21, 2022, 08:15 AM IST
Chinese Female Spy: बापरे! चीनच्या महिला गुप्तहेराला पकडण्याचा थरार चित्रपटाहून कमी नाही, पाहा  title=
big news Chinese Female Spy caught by delhi police

Chinese Female Spy Arrested in Delhi:  देशाच्या राजधानीत घडलेल्या थरारक घटनेनं अनेकांनाच हैराण केलं. नुकतंच दिल्लीत चीनच्या (China spy) एका महिला गुप्तहेराला अटक करण्यात आली. मजनू दिला या भागात ही महिला चक्क बौद्ध भिक्खूच्या (Buddhist Monk) वेशात राहात होती. तिनं वेशही असा धारण केला होता, की कोणालाही तिचा तिळमात्र संशय आला नाही. महिलेला अटक केल्यानंतर (Nepal) नेपाळी नागरिक असल्याची कागदपत्रं तिच्याकडे सापडली. त्यावर तिचं नाव डोल्मा लामा असं लिहीलं आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलेकडे नेपाळची कागदपत्र सापडली असली तरीही ती चीनसाठी हेरगिरी करत असल्याचं तपासातून उघड झालं आहे. देशविरोधी कारवाया करण्यात या महिलेचा सहभाग आढळला आहे. 2019 मध्ये चिनी पासपोर्टआधारे तिने भारतात प्रवेश केल्याचं उघड झालं. या चिनी महिला हेराच्या अटकेनंतर दिल्लीत हायअलर्ट (Delhi on high Alert) देण्यात आला आहे.

पोलिसांकडून (Delhi Police Special Cell) मिळालेल्या माहितीनुसार ही महिला गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीत राहत आहे. 2019 मध्ये तिनं चीनच्या पासपोर्टवर भारत दौरा केला ज्यानंतर ती परत गेली. पण, नंतर ती नेपाळला गेली, तिथे डोल्मा लामा नावाची कागदपत्र तयार केली आणि रस्ते मार्गानं ती पुन्हा भारतात आली. 

ही महिला मूळची कुठली? 
सूत्रांच्या माहितीनुसार ही महिला गुप्तहेर चीनच्या हैनान प्रांतातील आहे. सुरुवातीला तिनं आपण नेपाळी नागरिक असल्याची माहिची दिली. पण, पोलिसांनी तिला नेपाळी भाषेत बोलण्यास सांगितलं तेव्हा मात्र ती गोंधळली. ज्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली. पुढे तिनं आपण (Tibet) तिबेटची रहिवासी असल्याचं सांगत बौद्ध भिक्खू असल्याचा मुखवटा धारण केला. चीनमधील कम्युनिस्ट नेते आपल्या जीवावर उठले आहेत ज्यामुळं आपण पळ काढला अशी कहाणी तिनं रचली. 

कोणती कटकारस्थानं रचत होती ती महिला? 
पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार ही महिला भारताशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती चीनमध्ये देत होती. सदर प्रकरणाचं गांभीर्य पाहता रॉ (RAW), आयबी (IB) आणि लष्कराकडून आता तिची चौकशी करण्यात येणार आहे. तेव्हा आता या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि या महिलेच्या संपर्कात आणखी कोण कोण आहे, यासंदर्भातील माहितीकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे