लंडन : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आणि भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याला त्याच्या लंडनमधील आलिशान घरातून बाहेर पडावं लागणार आहे. स्विस बँक UBS सोबत दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात मल्ल्याचे घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाचे पालन करण्यास स्थगिती देण्याची मागणी मल्ल्याने केली होती. परंतु त्याला या घरातून बेदखल करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याचा अर्ज ब्रिटनमधील न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.
लंडनच्या रीजेंट पार्कमधील 18/19 कॉर्नवॉल टेरेस लक्झरी अपार्टमेंट सध्या मल्ल्याची 95 वर्षीय आई ललिता यांच्या ताब्यात आहे. "लाखो पौंड किमतीची विलक्षण मौल्यवान मालमत्ता" म्हणून न्यायालयात या मालमत्तेचे वर्णन केले गेले.
लंडन उच्च न्यायालयाच्या चॅन्सरी विभागाचे न्यायाधीश मॅथ्यू मार्श यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मल्ल्या कुटुंबाला थकबाकी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे मल्ल्या कुटूंबाला या मालमत्तेतून कधीही बेदखल केले जाऊ शकते.
विजय मल्ल्याला स्विस बँकेचे 204 दशलक्ष पौंडांचे कर्ज परत करायचे आहे. त्याकारणामुळे बँकेने त्याच्या घरावरती जप्ती आणली आहे.
विजय मल्ल्या मार्च 2016 पासून ब्रिटनमध्ये आहे. सध्या बंद असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा तो मालक होता, त्यावेळी 9 हजार कोटी रुपयांहून अधिक बँक कर्जाच्या डिफॉल्ट प्रकरणात तो आरोपी आहे. ज्यामुळे तो रातोरात भारतातून फरार झाला होता.