बिहार निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, कोरोनाची लस मोफत देणार

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे.  

Updated: Oct 22, 2020, 04:32 PM IST
बिहार निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, कोरोनाची लस मोफत देणार  title=
संग्रहित छाया

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बिहार निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 

बिहार निवडणुकीसाठी भाजपने अनेक संकल्प सोडले आहे. त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी कोरोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. मेडीकल, इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देण्याची घोषणा केली आहे. तसेच तीन लाख शिक्षकांची भरती करणार असल्याचे म्ह्टले आहे. बिहारला आयटी हब बनवणार आणि ५ लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. तर १ कोटी महिलांना स्वावलंबी बनविण्याची घोषणा केली आहे. 

काँग्रेसची जाहीनाम्यावर टीका

आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना कोरोनाची मोफत लस देण्याचे म्हटले आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली. यावरून आता काँग्रेसनं टीका केली आहे. लस देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, लस कधी येणार हे अजून काहीही माहित नाही. मात्र, हे आश्वासन देऊन मोकळे झाले आहेत. भाजपचा हा टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी केलाय. सत्यजीत तांबे सध्या बिहारमध्ये पक्षाचा प्रचारात सक्रीय आहे. 

भाजपच्या जाहीरनाम्यात काय?

- मेडीकल, इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार
- तीन लाख शिक्षकांची भरती करणार
- बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार
- १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार
- मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार
- कोरानाची लस आल्याबरोबर मोफत देणार
- एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या देणार
- दरभंगामध्ये २०२४पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची (एम्स) उभारणी करणार
- धान्य आणि गहू याबरोबरच आता सरकार डाळ विकत घेणार
- २०२२पर्यंत राज्यात ३० लाख लोकांना पक्की घरे देणार
- गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाला अधिक चालना देणार
- दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार