AIMIM नेत्याची गोळ्या झाडून हत्या; ओवेसी म्हणाले, 'आमच्या नेत्यांना का टार्गेट केलं जातं?'

Bihar Crime News : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात सोमवारी रात्री एआयएमआयएमचे राज्य सचिव अब्दुल सलाम उर्फ ​​अस्लम मुखिया यांची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. तुर्कहा पुलाजवळ दुचाकीस्वार गुन्हेगारांनी त्यांची हत्या केली.

Updated: Feb 13, 2024, 04:59 PM IST
AIMIM नेत्याची गोळ्या झाडून हत्या; ओवेसी म्हणाले, 'आमच्या नेत्यांना का टार्गेट केलं जातं?' title=

Bihar Crime : बिहारमध्ये एकीकडे राजकीय संघर्ष सुरु असतानाच मोठी घटना घडली आहे. बिहारमध्ये एआयएमआयएम नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात हल्लेखोराने एआयएमआयएमचे राज्य सचिव आणि सारणचे प्रभारी अब्दुल सलाम उर्फ ​​अस्लम मुखिया यांची गोळ्या झाडून हत्या केली. अस्लम मुखिया हे गोपालगंज इस्लामिया मदरशाच्या सचिवपदावरही होते. गोपालगंज विधानसभा मतदारसंघाची मागील पोटनिवडणूकही त्यांनी लढवली होती. या हत्येनंतर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रोष व्यक्त केला. आमचेच नेते टार्गेटवर का आहेत? असा सवाल ओवेसी यांनी केला.

गोपालगंज येथील नगरपालिका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुर्कहा पुलाजवळील राष्ट्रीय महामार्ग 531 वर ही धक्कादायक घटना घडली. सोमवारी रात्री उशिरा अस्लम मुखिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अस्लम मुखिया हे एआयएमआयएमे राज्य सचिव आणि पक्षाच्या सारण विभागाचे प्रभारी होते. त्यांच्या हत्येने परिसरता खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम मुखिया हे त्यांचा जवळचा मित्र फैसल इमाम मुन्ना याच्यासोबत लखनऊला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी थवे जंक्शनला जात होते. त्याचवेळी बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची कार थांबवली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर हल्लेखोर शस्त्रे दाखवून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी अस्लम मुखिया यांना गोपालगंजच्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नेले. मात्र उपचारादरम्यान अस्लम मुखिया यांचा मृत्यू झाला.

मुख्यंमत्र्यांनी खुर्चीच्या खेळातून वेळ काढावा - असदुद्दीन ओवेसी

या हत्येनंतर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रोष व्यक्त केला. "गोपालगंज पोटनिवडणुकीत एआयएमआयएमचे माजी उमेदवार कम राज्य सचिव अब्दुल सलाम अस्लम मुखिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबीयांना धीर मिळायला हवा. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आमचे सिवान जिल्हाध्यक्ष आरिफ जमाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुख्यमंत्री नितीश कुमार खुर्ची वाचवण्याच्या खेळातून वेळ मिळाला तर काही कामही करा? फक्त आमचे नेतेच का टार्गेट आहेत? त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल का?" असे ओवेसी यांनी म्हटलं आहे.