नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झालंय. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष समसमान जागा लढणार आहेत. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ही जागावाटपाची घोषणा केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमधल्या ४० जागांपैकी भाजपा आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १६ जागा लढवेल. तर रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीसाठी ६ तर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीला २ जागा सोडण्यात येणार आहेत.
मात्र या घोषणेनंतर अल्पावधीतच कुशवाह यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात. अर्थात, कुशवाह यांनी या भेटीमागे कोणतंही राजकारण नसल्याचा खुलासा केला असला तरी बिहारमधल्या सत्ताधारी आघाडीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा यानिमित्तानं सुरू झाली आहे.