Crime News : बिहारमधून (Bihar Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. बिहारमध्ये आतापर्यंत तिथल्या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटना घडल्या जात असल्याचे पाहायला मिळत होतं. मात्र आता बिहारचं पोलीस (Bihar Police) दलही यामध्ये मागे राहिलेलं नाही. बिहारच्या मुझफ्फरपूरमधून (muzaffarpur) पोलिसांचा घृणास्पद चेहरा समोर आला आहे. अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला तीन पोलिसांनी रस्त्यावरून उचलून नाल्यात फेकून दिलं आहे. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूर पोलिसांचा लाजिरवाणे कृत्य समोर आलं आहे. मुझफ्फरपूरच्या हाजीपूर मुझफ्फरपूर रोडवर अपघातात मृत्यू झालेल्या मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी रस्त्यावरून उचलून रुग्णालयात पाठवण्याऐवजी कालव्यात फेकून दिला. हा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली होती. ट्रकच्या धडकेने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत व्यक्तीला चिरडल्यानंतर चालक ट्रकसह पळून गेला. वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.
मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवला
पोलीस कर्मचारी मृतदेह पुलावरून कालव्यात फेकत असताना तिथल्याच एका व्यक्तीने हा सगळा प्रकार शूट केला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही. मात्र माध्यमांच्या वृत्तानुसार, पंचनामा व शवविच्छेदन यांसारखी आवश्यक प्रक्रिया टाळण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या काठ्यांच्या साहाय्याने मृतदेह कालव्यात फेकून दिला. हा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनीच मृतदेह कालव्यातून काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांचे निवदेन ऐकून बसेल धक्का
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागामध्ये खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या निवेदनामध्ये फाकुली पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. मात्र काही अवशेष रस्त्यावर उरले असून ते कालव्यात वाहून गेले आहेत असे सांगितले आहे. मात्र व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी स्पष्टपणे संपूर्ण मृतदेह पुलावरून खाली कालव्यात फेकत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक पोलीस मृतदेह पायाच्या बाजूने उचलतो आणि दुसरा कर्मचारी काठीने सहाय्याने त्याला पुलाखाली फेकतो.
हा सगळा प्रकार वेगाने सगळ्या राज्यात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी घटनास्थळी जाऊन कालव्यातून मृतदेह बाहेर काढला आहे. स्थानिकांनी याचेही व्हिडीओ शूटिंग करुन व्हायरल केले आहे. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनावर वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना काहीच उत्तर देता आलेलं नाही. उलट पोलिसांनी सांगितले की आम्ही व्हायरल व्हिडीओचा तपास करत आहोत. दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर सत्यता लक्षात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल.