Himachal Pradesh News : भारत हा एक विविधतेनं नटलेला देश आहे. अगदी जगाच्या पाठीवर कुठेही या देशाची ओळख करायची झाल्यास असंच काहीसं म्हटलं जातं. तुम्ही या देशातील विविध राज्यांना, प्रदेशांना भेट दिली असेल तर या ओळीचा नेमका अर्थ तुमच्या लक्षात आलाच असेल. अशा या देशात विविध धार्मिक रुढी, धारणा आणि परंपराही प्रचलित आहेत. त्यातल्या काही इतक्या अदभूत आणि अनपेक्षित आहेत ज्याची उकल विज्ञानही करु शकलेलं नाही. हिमाचल प्रदेशातील एका शंकराच्या मंदिरात याचीच प्रचिती येते. (bijli mahadev temple in himachal pradesh facts travel news )
हिमाचलच्या (Himachal Pradesh) कुल्लू येथील हे एक अतिशय लोकप्रिय असं मंदिर आहे. कुल्लूच्या खोऱ्यातील काशवरी या गावात हे मंदिर असून, समुद्रसपाटीपासून त्याचं अंतर साधारण 2460 मीटर इतकं आहे. शंकराच्या या मंदिरात वर्षभरात भाविकांची ये-जा सुरुच असते.
बिजली महादेव असं या मंदिराचं नाव. या मंदिरात असणारं शिवलिंग दर 12 वर्षांनी कडाडणाऱ्या वीजेमुळं रहस्यमयरित्या खंडित होतं. स्थानिकांच्य़ा धारणेनुसार शिवलिंग वीजेमुळं खंडित होणं म्हणजे इथल्या नागरिकांवरचं संकट टळण्याचे शुभसंकेत आहेत. काहींच्या मते वीज ही एक दिव्य शक्ती असून, तिच्यामध्ये अनेक शक्तींचा वावर आहे.
असं म्हणतात की याच मंदिरात पौरोहित्य करणारे पुजारी शिवलिंगाचे भाग एकत्र करून डाळींची पीठं, तूप यांपासून तयार करण्यात आलेल्या एका मिश्रणानं जोडतात. ज्यानंतर काही महिन्यांतच हे शिवलिंग पूर्ववत दिसू लागतं. काहींच्या मते शिवशंकराच्या आदेशानंतर इंद्रदेव इथं दर 12 वर्षांनी वीज पाडतात. या मंदिराविषयीच्या कथा अनेक आहेत. हा झाला ज्याच्यात्याच्या विश्वासाचा भाग. पण, निसर्गसौंदर्याच्या अगाध लीला पाहण्यासाठी या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या.
कुल्लूपासून हे मंदिर 20 किमी अंतरावर आहे. इथं येण्यासाठी तुम्हाला साधारण 3 किलोमीटरचा ट्रेकही करावा लागतो. पर्वतरागांच्या कुशीत असणाऱ्या या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातो.