व्हिडिओ : कर्नाटक सत्ता पेचात प्रमोद महाजन यांचं ते भाषण पुन्हा एकदा वायरल

 'भारतातल्या एकमेव सर्वात मोठ्या पक्षाचा मी सदस्य आहे... परंतु, मी विरोधकांच्या बाकावर आहे'

Updated: May 16, 2018, 05:57 PM IST
व्हिडिओ : कर्नाटक सत्ता पेचात प्रमोद महाजन यांचं ते भाषण पुन्हा एकदा वायरल  title=

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२२ जागांचे निकाल लागल्यानंतर राज्यात त्रिशंकू अवस्था दिसून येतेय... या निवडणुकीत भाजप १०४ जागांसहीत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतापासून दूर आहे... आणि काँग्रेस ७८ जागा तर जेडीएस  ३८ जागांसहीत सत्तास्थापनेसाठी एक पाऊल पुढे टाकलंय... तर राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलंय... याच सत्तासंघर्षादरम्यान दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा १९९७ सालातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

भाजप हा कर्नाटकातला सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमत मात्र भाजपच्या पारड्यात पडलेलं नाही... १९९७ सालातही असंच काहीसं चित्र दिसत होतं, ज्यावर प्रमोद महाजन यांनी भाष्य केलं होतं... या व्हिडिओत लोकसभेत बोलताना प्रमोद महाजन भारतातली लोकशाही आपल्या पद्धतीनं समजावून सांगताना दिसत आहेत. 

भारतातल्या लोकशाहीबद्दल चीनच्या दौऱ्यात बोलताना प्रमोद महाजन म्हणतात... 'भारतातल्या एकमेव सर्वात मोठ्या पक्षाचा मी सदस्य आहे... परंतु, मी विरोधकांच्या बाकावर आहे. भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्षही सत्तेबाहेर आहे परंतु, त्यांनी सरकारला पाठिंबा दिलाय. तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष असलेला सदस्य उजव्यांसोबत असला तरी तो सत्तेत सहभागी नाही... मात्र, सर्वात लहान पक्षाच्या एकमेव सदस्यानं सत्ता स्थापन केलीय... तीही स्वबळावर'... कर्नाटकातली आजची स्थितीही काहीशी अशीच दिसतेय... आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

 

कर्नाटकात कुणाचं सरकार?

सत्तासंघर्ष सुरू असताना राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. उद्या भाजपाचे बी.एस. येडियुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. बंगळुरूमधल्या स्टेडियममध्ये हा जंगी सोहळा होणार आहे. या निर्णयामुळे काँग्रेसनं संताप व्यक्त केला असून राजभवनावर निदर्शनं करण्याचा इशारा देण्यात आलाय. तसंच या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारीही काँग्रेसनं केलीये. दरम्यान, सर्व आमदार काँग्रेससोबत असून कुमारस्वामींवर कुणीही नाराज नसल्याचा दावा ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे... तर भाजपच्या आमदारांची बैठक आज संपन्न झाली. त्यात येडीयुरप्पांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. . त्यानंतर येडीयुरप्पा पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा सादर करण्यासाठी राज्यपालांना भेटीला गेले. येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेतल्यावर सकारत्मक निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला