नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील संवेदनशील मतदारसंघ आणि योगी आदित्यनाथ यांचा गड मानल्या जाणाऱ्या गोरखपूरमधून भाजपने भोजपुरी अभिनेता रवी किशन याला उमेदवारी दिली आहे. तर या मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रवीण निषाद यांना शेजारच्या संत कबीर नगर मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले आहे. संत कबीर नगरमधील विद्यमान खासदार शरद त्रिपाठी यांना उमेदवारी नाकारण्यात आली. काही दिवसांपूर्वी एका स्थानिक आमदाराला केलेल्या हाणामारीमुळे शरद त्रिपाठी प्रकाशझोतात आले होते. अखेर त्याची परिणती शरद त्रिपाठी यांना डच्चू मिळण्यात झाली आहे.
भाजपकडून सोमवारी उत्तर प्रदेशातील सात उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रतापगढ येथून संगमलाल गुप्ता, आंबेडकर नगरमधून मुकुट बिहारी, जौनपूर मधून केपी सिंह आणि भद्रोही येथून रमेश बिंद यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
Lok Sabha Elections 2019: Bharatiya Janata Party announces list of seven candidates for Uttar Pradesh ; Ravi Kishan (in file pic) to contest from Gorakhpur and Praveen Nishad to contest from Sant Kabir Nagar (Sharad Tripathi is the sitting MP from Sant Kabir Nagar) pic.twitter.com/myUwtpOF50
— ANI UP (@ANINewsUP) April 15, 2019
गोरखपूर मतदारसंघ योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो. ते पाचवेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र, २०१७ साली योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर गोरखपूरमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी प्रवीण निषाद समाजवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. यावेळी त्यांना बसपानेही पाठिंबा दिला होता. मात्र, यावेळी प्रवीण निषाद यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सपा-बसपला धक्का दिला. त्यामुळे निषाद यांनाच गोरखपूरमधून उमेदवारी मिळेल, असा सगळ्यांचा अंदाज होता. मात्र, भाजपने रवी किशन यांना गोरखपूरमधून उमेदवारी देऊन सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला.