अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी, २०१९मध्ये भाजपला मिळतील एवढ्या जागा

२०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपनं आधीच सुरू केली आहे.

Updated: Feb 6, 2018, 04:54 PM IST
अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी, २०१९मध्ये भाजपला मिळतील एवढ्या जागा title=

नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपनं आधीच सुरू केली आहे. या निवडणुकींमध्ये ३५० जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलं आहे. पण दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपबद्दल भविष्यवाणी केली आहे. २०१९च्या निवडणुकींमध्ये भाजपला २१५ जागांवरही विजय मिळणार नाही, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.

भाजपनं देशाच्या जनतेची निराशा केली आहे आणि याचा फटका भाजपला निवडणुकीत बसेल, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. बेरोजगारी सगळ्यात मोठी समस्या आहे. तरुण त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहे. मध्यम वर्गाचा भाजपनं अपेक्षा भंग केला आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे. मोदी सरकार पकोडा विकण्याला चांगला रोजगार म्हणत आहे. पण आम्ही युवकांना इंजिनिअर, डॉक्टर का नाही बनवत, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.

 

अमित शहांचं मिशन २०१९

भाजपनं मिशन २०१९ची जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत ३५० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं. या बैठकीत मंत्री आणि खासदारांना टारगेट देण्यात आलं आहे.

नवी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात ही बैठक पार पडली. २०१४ सालच्या ज्या १५० जागांवर भाजपचा पराभव झाला तिकडे जास्त लक्ष देण्याची रणनिती भाजपनं आखली आहे. या बैठकीला भाजपचे जवळपास ३१ नेते उपस्थित होते.