बंगळुरु : कर्नाटकमध्ये भाजप पुढच्या आठवड्यात नवं सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा भाजपचे आमदार उमेश कट्टी यांनी केला आहे. बुधवारी भाजपच्या या आमदाराने म्हटलं की, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (JDS)च्या युतीमुळे नाराज असलेले १५ आमदार आमच्या संपर्कात आहे आणि ते भाजपमध्ये येण्यास उत्सूक असतील तर त्यांचं स्वागत आहे. कट्टी हे भाजपचे दिग्गज नेते आहेत आणि आतापर्यंत ते ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
कट्टी यांनी दावा केला आहे की, भाजप पुढच्या आठवड्यात नवं सरकार बनवणार आहे. या दाव्यावर मात्र काँग्रेसने कडवी प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडु राव यांनी म्हटलं की, 'ते लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत.' कर्नाटकमध्ये झालेल्या कॅबिनेट विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात कट्टी यांच्या या दाव्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीएस येदियुरप्पा यांनी काँग्रेसने कोणतेच आमदार आपल्या संपर्कात नसल्याचं म्हटलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ७८ तर जनता दल सेक्युलरला ३८ जागा मिळाल्या आहेत. कर्नाटकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता पण तरी त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही. बहुमताचा आकडा गाठता न आल्याने येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर जनता दल सेक्युलरने काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं होतं. एचडी कुमारस्वामी राज्याचे मुख्यमंत्री बनले.