'तुम्ही ना प्रचार केलात, ना संघटनेच्या कामात रस दाखवता,' भाजपाने आपल्याच माजी केंद्रीय मंत्र्याला पाठवली नोटीस

भारतीय जनता पक्षाने माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना नोटीस बजावली आहे. त्यांना या नोटीशीवर दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 21, 2024, 12:13 PM IST
'तुम्ही ना प्रचार केलात, ना संघटनेच्या कामात रस दाखवता,' भाजपाने आपल्याच माजी केंद्रीय मंत्र्याला पाठवली नोटीस title=

भाजपाने आपल्याच पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटीशीवर त्यांना दोन दिवसांत उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून मनिष जयस्वाल यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून तुम्ही ना संघटनेच्या कामात रस घेत आहात, ना प्रचारात सहभागी होत आहात असं पक्षाने नोटीसमध्ये म्हटलं आहे. तसंच सोमवारी पाचव्या टप्प्यात तुम्ही आपला मतदानाचा हक्कही बजावला नसल्याचं पक्षाने म्हटलं आहे. भाजपाने धनबादचे आमदार राज सिन्हा यांनाही नोटीस पाठवली आहे. 

"आपल्या मतदान अधिकाराचा वापर करणं तुम्हाला योग्य वाटलं नाही. तुमच्या वर्तवणुकीमुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे," असं भाजपाचे झारखंडचे सरचिटणीस आदित्य साहू यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे. भाजपने त्यांच्याकडून दोन दिवसांत स्पष्टीकरण मागवलं आहे.

जयंत सिन्हा यांचा मुलगा आशिष सिन्हा झारखंडमध्ये इंडिया आघाडीच्या रॅलीत सहभागी झाला होता. काँग्रेस अध्यक्ष मललिकार्जून खर्गे या रॅलीत उपस्थित होते. या रॅलीत आशिष सिन्हा यांनी काँग्रेस उमेदवार जे पी पटेल यांना पाठिंबा जाहीर केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 

मार्चमध्ये जयंत सिन्हा यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच भाजपा नेतृत्वाला त्यांना निवडणुकीच्या राजकारणातून मुक्त करण्याची विनंती केली होती. जयंत सिन्हा आणि त्यांचे वडील यशवंत सिन्ह यांनी 1998 पासून त्यांच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

जयंत सिन्हा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आता आपल्याला भारत आणि जगभरातील हवामान बदलाशी लढण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे असं सागितलं होतं. मात्र, यावेळी त्यांनी आर्थिक आणि प्रशासनाच्या मुद्द्यांवर पक्षासोबत काम करत राहणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. 

भाजपाने धनबादचे आमदार राज सिन्हा यांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. आपल्या मतदारसंघातील भाजपा उमेदवाराविरोधात विधान केल्याने त्यांना ही नोटीस पाठवली आहे. 

यशवंत सिन्हा विरोधकांच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

जयंत सिन्हा यांचे वडील यशवंत सिन्हा बराच काळ भाजपात होते. नंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा केली होती. विरोधकांकडून त्यांना राष्ट्रपतीपदाचं उमेदवार करण्यात आलं होतं. यशवंत सिन्हा यांनी हजारीबाग मतदारसंघाचं नेतृत्वही केलं आहे. मुलगा जयंत सिन्हा यांच्या विजयात दोन वेळा त्यांनी मोठी भूमिका निभावली.