'मी RSS चा सदस्य होतो, पुन्हा संघटनेत जाण्यास तयार,' हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं निरोप समारंभात विधान

न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी जर आपल्याला कोणत्याही मदतीसाठी किंवा आपण सक्षम असलेल्या कोणत्याही कामासाठी बोलावलं तर संस्थेत परत जाण्यास तयार आहोत असं सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 21, 2024, 11:30 AM IST
'मी RSS चा सदस्य होतो, पुन्हा संघटनेत जाण्यास तयार,' हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं निरोप समारंभात विधान title=

न्यायाधीश चित्तरंजन दास सोमवारी कोलकाता हायकोर्टातून निवृत्त झाले. आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात चित्तरंजन दास यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सदस्य असल्याची माहिती दिली. उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि बारच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निरोप समारंभात बोलताना न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांनी जर त्यांना कोणत्याही मदतीसाठी किंवा सक्षम असलेल्या कोणत्याही कामासाठी बोलावलं तर संस्थेत परत जाण्यास तयार आहेत असं सांगितलं आहे. 

"काही लोक माझा तिरस्कार करतील, पण मी कबूल केलं पाहिजे की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सदस्य होतो आणि आहे," असं यावेळी त्यांनी सांगितलं. हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून 14 वर्षांहून अधिक काळ पद भूषवल्यानंतर, न्यायमूर्ती चित्तरंजन दास ओरिसा उच्च न्यायालयातून बदली झाल्यावर कोलकत्ता उच्च न्यायालयात आले होते.

"मी संस्थेचा खूप ऋणी आहे. मी माझ्या लहानपणापासून आणि तरुणपणापासून तिथे आहे," असं त्यांनी सांगितलं. "मला तिथे धाडसी होण्याची तसंच सरळ आणि इतरांबद्दल समान दृष्टिकोन ठेवण्याची शिकवण मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशभक्तीची भावना आणि कामासाठी बांधिलकी याबद्दल शिकलो," असंही त्यांनी सांगितलं. 

न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांनी यावेळी आपल्या कामाचं स्वरुप लक्षात घेता सुमारे 37 वर्षे संघटनेपासून स्वतःला दूर केले होते असं सांगितलं. "मी माझ्या करिअरमधील प्रगतीसाठी कोणत्याही प्रकारे संस्थेच्या सदस्यत्वाचा वापर केला नाही. कारण ते तत्त्वांच्या विरुद्ध आहे," असं ते म्हणाले.

न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांनी आपण प्रत्येकाला समान वागणूक दिली, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, कम्युनिस्ट असो किंवा भाजप, काँग्रेस किंवा टीएमसी (तृणमूल काँग्रेस) असो असं ते म्हणाले.. "माझ्यासमोर सर्व समान आहेत, मी कोणासाठी किंवा कोणत्याही विशिष्ट राजकीय तत्त्वज्ञानासाठी किंवा यंत्रणेसाठी कोणताही पक्षपात करत नाही," असं सांगत ते पुढे म्हणाले की, त्यांनी सहानुभूतीच्या तत्त्वांवर न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं. 

"मी आयुष्यात काहीच चुकीचं केलं नसल्याने मी या संस्थेचा आहे हे सांगण्याचं धाडस आहे. कारण यातही काही चुकीचं नाही", असं ते म्हणाले. जर आपण चांगले व्यक्ती होतो, तर चुकीच्या संस्थेत असू शकत नाही अशी जोडही त्यांनी दिली.