'मोदी है तो मुमकिन है'... भाजप प्रचाराची नवी टॅगलाईन

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतात

Updated: Mar 5, 2019, 02:15 PM IST
'मोदी है तो मुमकिन है'... भाजप प्रचाराची नवी टॅगलाईन title=

नवी दिल्ली : भाजपा २०१९ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादाच्या मुद्यावर लढण्याची शक्यता आहे. भाजपानं २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची रणनिती बदललीय. या वेळीच्या निवडणूक प्रचारात विकासासोबतच राष्ट्रवादाचा मुद्दाही आक्रमकपणे प्रचारात मांडणार आहेत. भारतीय हवाईदलानं केलेली 'एअर स्ट्राईक' आणि विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्ताननं केलेली सुटका हे मुद्दे भाजपा प्रचारात आणण्याची शक्यता आहे. 'अशक्य आता शक्य आहे' या थिमवर प्रचार केंद्रीत केला जाणार आहे. 'मोदी है तो मुमकिन है' हे प्रचाराचं सर्वात महत्त्वपूर्ण घोषवाक्य असणार आहे. सध्याही भाजप नेते 'नामुमकिन भी अब मुमकिन है' म्हणत प्रचार करताना दिसत आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर राजस्थानमधील टोंकच्या सभेत पंतप्रधानांनी 'मै देश नही झुकने दुंगा' ही कविता सादर केली होती. ही कविताच प्रचाराच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखांबद्दल अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतात. पण यापूर्वीच दरम्यान भाजप आपली निवडणूक रणनीती तयार बनवण्यात व्यग्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्यांसोबतच 'राष्ट्रवादा'वर भर असेल. 

इतकंच नाही तर, भाजपनं गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही गीतकार प्रसून जोशी यांना भाजपसाठी राष्ट्रवादावर आधारित नवं गाणं आणि प्रचाराची थीम तयार करण्यास सांगितलं आहे. 'कसम है मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगा' या मोदींनी म्हटलेल्या कवितेवर या गाण्यांची थीम आधारलेली असेल.