close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO: केजरीवालांना चिडवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना गडकरींनी बसवले गप्प

भाजपचे हे कार्यकर्ते काही केल्या ऐकायला तयार नव्हते. 

Updated: Dec 28, 2018, 07:22 AM IST
VIDEO: केजरीवालांना चिडवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना गडकरींनी बसवले गप्प

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजप नेत्यांमधून विस्तवही जात नाही, ही बाब सर्वश्रूत आहे. मात्र, गुरुवारी दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाषणासाठी उभे राहिले तेव्हा भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मुद्दामहून खोकायला सुरुवात केली. केजरीवाल जेव्हा जेव्हा बोलायला सुरुवात करायचे तेव्हा हा प्रकार सुरु व्हायचा. केजरीवाल यांनी या लोकांना शांत राहण्याची विनंतीही केली. मात्र, भाजपचे हे कार्यकर्ते काही केल्या ऐकायला तयार नव्हते. अखेर व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉ. हर्षवर्धन सिंह यांनी हस्तक्षेप केला. गडकरी यांनी व्यासपीठावरूनच भाजप कार्यकर्त्यांना शांत राहण्याची सूचना दिली. शांत राहा, हा सरकारी कार्यक्रम आहे, असे त्यांनी सांगितले. अखेर कार्यकर्त्यांनी गडकरींचे म्हणणे ऐकले आणि केजरीवाल यांचे भाषण निर्विघ्नपणे पार पडले. 

स्वच्छ गंगा राष्ट्रीय मोहीम आणि दिल्ली जल मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, जलसंधारण मंत्री सत्यपाल सिंह आणि भाजपचे अनेक खासदार उपस्थित होते.

काही महिन्यांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरी भारतातील सर्वात भ्रष्ट व्यक्तींपैकी एक असल्याचा आरोप केला होता. यानंतर गडकरी यांनी केजरीवालांविरुद्ध न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. अखेर केजरीवाल यांनी माफीनामा सादर केल्यानंतर गडकरी यांनी हा खटला मागे घेतला.