हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा रोड शो

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा रोड शो

Updated: Nov 27, 2020, 06:44 PM IST
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा रोड शो title=

हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज हैदराबादमध्ये भाजपचा रोड शो आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा हा रोड शो नागोले येथून सुरू झाला असून कोठापेट चौकाजवळ संपणार आहे. भाजप अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करतील.

भूपेंद्र यादव हे जीएचएमसी निवडणुकीचे पक्षाचे प्रभारी असून जीके रेड्डी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते आधीच हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत.

4 डिसेंबर रोजी मतमोजणी

हैदराबादमधील या निवडणुकीत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), एआयएमआयएम आणि भाजप यांच्यात त्रिकोणी टक्कर आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने दुब्बक विधानसभेच्या जागेवर विजय मिळवला होता. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 4 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. 

गुरुवारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबादमध्ये पक्षाचा निवडणूक जाहीरनामा जाहीर केला. हैदराबादच्या जनतेसाठी पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात गरीब कुटुंबातील मुलांसाठी विनामूल्य टॅब्लेट आणि व्हर्च्युअल एज्युकेशन सिस्टमशी जोडण्यासाठी मोफत वायफाय सुविधा समाविष्ट आहे.

जाहीरनाम्यातील इतर आश्वासनांमध्ये झोपडपट्टीधारकांसाठी मालमत्ता कर 100% माफी आणि सर्व घरांना पिण्यासाठी मोफत पाणीपुरवठा यांचा समावेश आहे. थेट बाधित हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) पूरग्रस्तांना 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचेही आश्वासन भाजपने दिले आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि स्मृती इराणी हेदेखील हैदराबादमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत.