मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चार नेत्यांची नावे घेण्यास दबाव टाकण्यात आला. या साक्षीदाराचे जबाब महाराष्ट्र एटीएसने नोंदवले होते. या प्रकरणाच्या चौकशी नंतर एनआयएने सुरू केली. या साक्षीदाराने मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयात जबाब नोंदवला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग हे 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करताना एटीएसचे अतिरिक्त आयुक्त होते. परमबीर सिंग यांच्यावर सध्या खंडणी आणि इतर अनेक आरोपांची चौकशी सुरू आहे.
साक्षीदाराने त्याच्या साक्षीदरम्यान न्यायालयाला सांगितले की, तत्कालीन वरिष्ठ एटीएस अधिकारी परमबीर सिंग आणि अन्य अधिकाऱ्याने त्याला उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इंद्रेश कुमार यांच्यासह चार आरएसएस नेत्यांची नावे सांगण्यास सांगितले होते.
2008 च्या मालेगाव स्फोट प्रकरणी साक्षीदाराचा जबाब समोर आल्यानंतर संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी तत्कालिन संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA)वर प्रखर शब्दांत टीका केली आहे. युपीए सरकारने आम्हाला कथित भगवा दहशतवादाच्या खोट्या प्रकरणांमध्ये फसवण्याचा घाणेरड्या राजकारणाचा कट रचला होता.
इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस नेत्यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षप्रमुख सोनिया गांधी, माजी गृहमंत्री पी चिदंबरम, राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा, दिग्विजय सिंग आणि सलमान खुर्शीद यांनी भाजप आणि आरएसएस नेत्यांच्या बदनामीबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.
आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी एका ऑडिओ संदेशात म्हटले आहे की, "त्याने (साक्षीदाराच्या वक्तव्याने) हे सिद्ध केले आहे की त्यावेळच्या कथित भगव्या दहशतवादाची सर्व प्रकरणे काँग्रेसने आपल्या घाणेरड्या राजकारणाचा एक भाग म्हणून रचलेली होती." .
इंद्रेश कुमार यांनी दावा केला की तत्कालीन यूपीए सरकारने भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांना कथित भगव्या दहशतवादी प्रकरणांमध्ये गोवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले. परंतु त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ते आमच्यावर एफआयआर करू शकले नाहीत.
"मनमोहन सिंग (माजी पंतप्रधान), काँग्रेस नेते सोनिया गांधी, पी चिदंबरम, राहुल गांधी, प्रियंका गांधी, सलमान (खुर्शीद), दिग्विजय सिंग या सर्वांनी एवढं मोठं पाप आणि गुन्हा केल्याबद्दल माफी मागितली पाहिजे," असंही त्यांनी म्हटले.
29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात झालेल्या स्फोटात सहा जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते.
या प्रकरणी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर द्विवेदी, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहीकर, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत