भुवनेश्वर : ओडिशामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीकडून शनिवारी एका तृतीयपंथीयाला विधानसभेच्या जागेसाठी कोराई येथून उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. काजल नायक असे या तृतीयपंथीयाचे नाव आहे.
काजल नायक जयपूर येथे समाज सेविकेचे काम करतात. बसपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर काजल यांनी बहुजन समाज पार्टीचे आभार मानले. 'बसपाने मला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिल्याने मी खुश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मी अनेक राजकीय पक्षांना उमेदवारी देण्याबाबत विचारले होते परंतु कोणत्याही पक्षाने याबाबत माझी दखल घेतली नाही. माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण तृतीयपंथी समाजावर विश्वास ठेवल्यामुळे मी बहुजन समाज पार्टीची आभारी असल्याचे' काजल यांनी म्हटले. काजल जयपूरमध्ये तृतीयपंथी संस्थेच्या अध्यक्षा आहेत. तृतीयपंथींच्या अडचणी तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर काजल करतात.
बसपा नेते कृष्णा चंद्र सागरिया यांनी, पक्ष सर्व समुदायांच्या सामाजिक सशक्तीकरणामध्ये विश्वास ठेवत असल्याचे म्हटले आहे. कोणीही तृतीयपंथींयांबाबत बोलत नाही. आपल्याला जर त्यांचा विकास हवा असेल त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे सागरिया यांनी म्हटले. ओडिशामध्ये १४७ विधानसभा मतदारसंघ असून ११ एप्रिलपासून चार टप्प्यात मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयाला उमेदवारी देऊन त्यांना प्रकाशझोतात आणले जात आहे. त्यांचा विकासासाठी अशाप्रकारे त्यांना संधी दिल्याने बहुजन समाज पक्षाचे स्वागत केले जात आहे.