हत्तीला जिवंत पेटवण्याचं क्रौर्य येतं कुठून?

हत्तीचा मृत्यू झाला असून माणसात एवढं क्रौर्य येतं कुठून असा सवाल विचारला जातोय.

Updated: Jan 23, 2021, 09:55 PM IST

ब्य़ुरो रिपोर्ट झी २४ तास चैन्नई : मानवी वस्तीत घुसलेल्या जंगली हत्तीला हुसकावताना हत्तीला जिवंत पेटवल्याचा धक्कादायक प्रकार तामिळनाडूतल्या मसिनागुडीत घडलाय. भाजलेल्या हत्तीचा मृत्यू झाला असून माणसात एवढं क्रौर्य येतं कुठून असा सवाल विचारला जातोय.

हत्तीला जिवंत पेटवणारी ही माणसं पाहा.... यांना माणूस तरी म्हणायचं का असा प्रश्न पडतो... जंगलावर अतिक्रमण केलेल्या माणसानं त्याची हद्द वाढवत जंगलापर्यंत नेलीय. त्यामुळंच जंगलातले मुके प्राणी मानवी वस्तीजवळ येतात. मग त्यांना ही अशी क्रूर शिक्षा दिली जाते... तामिळनाडूच्या मसिनागुडीत मानवी वस्तीत जंगली हत्ती घुसला होता. 

हत्तीला पळवून लावण्यासाठी हत्तीच्या अंगावर पेटत्या वस्तू फेकण्यात आल्या. यात हत्तीची सोंड, कान आणि पाठ भाजून निघाली. गंभीर भाजलेल्या हत्तीवर उपचार करण्यात आले. 

पण दुर्देवानं हत्ती वाचू शकला नाही. हत्त्तीच्या मृत्यूनंतर हमसून रडणाऱ्या वन अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हत्तीच्या सोंडेला धरून हा फॉरेस्ट रेंजर धाय मोकलून रडला. 

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असोसिएशनने हा अत्यंत भावूक व्हिडिओ शेअर केला. आणि काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. 

नजरेतून सुटू शकतं पण हृदयातून नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया या व्हिडिओला दिलीय. माणूस किती क्रूर असतो आणि तो किती हळवा आहे हे या निमित्तानं अधोरेखित झालंय. 

या पृथ्वीवर या जंगलावर जेवढा माणसाचा हक्क आहे तेवढाच हक्क या मुक्या प्राण्यांचाही आहे. त्यांच्या हक्कावर गदा आणून माणूस सैतान झालाय एवढंच म्हणावं लागेल.