कंडोम घोटाळ्याचा संशय, ७५ पैशांच्या कंडोमला बोली पावणेदोन रुपयांची

भारतीय स्पर्धा आयोगाला कंडोम घोटाळा झाल्याचा संशय आहे.

Updated: Feb 12, 2018, 06:42 PM IST
कंडोम घोटाळ्याचा संशय, ७५ पैशांच्या कंडोमला बोली पावणेदोन रुपयांची

नवी दिल्ली : भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं व्यक्त केलेल्या कंडोम घोटाळ्याची चौकशी अंतीम टप्प्यात पोहोचली आहे. दोन महिन्यांमध्येच याचा अहवाल येईल अशी सूत्रांची माहिती असल्याची बातमी मिंट या वेबसाईटनं दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

एड्सच्या प्रतिबंधासाठी सरकार कंडोम खरेदी करून ते वितरीत करतं. कंडोम वितरणासाठी सरकारनं २०१४ साली निविदा मागवल्या होत्या. या निविदांसाठी १० कंपन्यांनी सहभाग घेतला पण या कंपन्यांनी संगनमत करुन प्रमाणाबाहेर नफा कमावल्याचा संशय आयोगाला आहे. म्हणून याची चौकशी सुरु असल्याची बातमी मिंटनं दिली आहे.

७५ पैशांच्या कंडोमसाठी १.८० रुपयांची बोली

२०१४ साली कंडोम वितरीत करण्यासाठी ५० कोटी कंडोम खरेदीचा निर्णय झाला. या खरेदीसाठी १० कंपन्यांनी बोली लावली. कंडोम उत्पादनासाठी ७५ पैसे खर्च असला तरी या सगळ्या कंपन्यांनी संगनमत करून एका कंडोमसाठी १ रुपया ८० पैशांची बोली लावली. ही किंमत उत्पादन खर्चाच्या १५० टक्के जास्त आहे.

कंडोमसाठी बोली लावणाऱ्या सर्वात जास्त आणि सर्वात कमी किंमतीमध्ये ९ ते १० पैशांचाच फरक होता.  या सगळ्या १० कंपन्यांच्या बोलीमध्ये फक्त २ ते ३ पैशांचाच फरक असल्यामुळे आयोगाचा संशय बळावल्याचं वृत्त मिंटनं दिलं आहे.