Tomato Price Hike: टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी सर्वसामान्यांना 100 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान टोमॅटोचे वाढते दर आजपासून आवाक्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळं येत्या तीन राज्यांत भाव कमी होणार आहे. मोदी सरकारने शेतमाल खरेदी संस्था अर्थात नाफेड आणि सहकारी संघांना आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. आजपासूनच देशातील तीन राज्यांसह महत्त्वाच्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर कमी होणार आहे.
आजपासून दिल्ली-एनसीआर, लखनऊ आणि पटणासह देशातील काही मेट्रो सिटीमध्ये स्वस्त दरात टोमॅटोची विक्री होणार आहे. केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं आजपासून प्रमुख ग्राहक केंदावर ९० रुपये दराने टोमॅटोची विक्री करण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर स्वस्त दराने टोमॅटो वितरित करण्यात येणार आहे. जिथे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहेत. तिथे स्वस्त किंमतीत विक्री केले जाणार आहेतय
राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ अर्थात नाफेड आणि राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघाकडून टोमॅटोची खरेदी करण्यात आली असून किरकोळ बाजारात किंवा मोबाइल व्हॅन, ट्रकमधून ग्राहकांपर्यंत टोमॅटो पोहोचवणार आहेत. सध्या महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटका या तीन राज्यांतून टोमॅटोची खरेदी करण्यात आली आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या दुकानांमध्येच 90 रुपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री करण्यात येणार आहे. तसंच, ठिकठिकाणी मोबाइल व्हॅन आणि ट्रकमधूनही विकण्यात येणार आहे.
येत्या काही दिवसांत लवकरच टोमॅटोचे दर कमी होणार आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत टोमॅटोचे उत्पादन कमी होते. तसंच, मान्सूनच्या कालावधीत भाजीपाल्याची वाहतूक करण्यास अडचणी येतात. त्यामुळं देखील दरवाढ होते. तसंच, दिल्ली आणि परिसरात विक्रीसाठी येणारे टोमॅटो प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून येतात. शिवाय टोमॅटोच्या उत्पादनात दक्षिणेकडील राज्यही आघाडीवर आहेत. त्यामुळं येत्या काही वाढात टोमॅटोचे भाव उतरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकरी राजाला मात्र अच्छे दिन आले आहेत. जुन्नरमधील एका शेतकऱ्याला मोठा फायदा झाला असून तो चक्क कोट्यधीश झाला आहे. तुकाराम गायकर असं या शेतकऱ्याचे नाव आहे. 11 जुलैला गायकर कुटुंबाने 900 कॅरेटची विक्री केली. त्यामुळे मंगळवारी या कुटुंबाला तब्बल 18 लाख रुपये मिळाले आहेत.