भले शाब्बास! चांद्रयान-३ने पू्र्ण केली दोन उद्दिष्ट्ये; राहिले केवळ १, इस्रोने दिली महत्त्वाची अपडेट

Chandryan-3 Mission Update: भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करुन मोहीम पूर्णपणे यशस्वी केली.यानंतर जगभरातून याचे कौतुक होत आहे. आता इस्रोने एक मोठी अपडेट दिली आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 27, 2023, 01:51 PM IST
भले शाब्बास! चांद्रयान-३ने पू्र्ण केली दोन उद्दिष्ट्ये; राहिले केवळ १, इस्रोने दिली महत्त्वाची अपडेट  title=
chandrayaan 3 completed 2 out of 3 objectives on moon isro gives info

Chandryan-3: चांद्रयान-3ने 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग केले. चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचणारा भारत चौथा देश ठरला आहे तर दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा भारत पहिला देश ठरला आहे. चांद्रयान-३ने यशाला गवसणी घालताच भारतात जल्लोष साजरा केला गेला. तर इस्रोच्या शास्त्रज्ञांचेही अभिनंदन करण्यात आले. चांद्रयान-३ मोहिमेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला असून आता खऱ्याअर्थांने मोहिम सुरू होणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिग होताच काहीच दिवसांत विक्रम लँडरमधून यशस्वीरित्या प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरले असून ते चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करण्यास सुरुवात केली आहे. इस्रोचे (ISro) शास्त्रज्ञ बारीक हालचालीवरही लक्ष ठेवून आहेत. याचवेळी इस्रोचे चीफ एस सोमनाथ यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञान रोव्हर चंद्रावर भ्रमण करत असून आतापर्यंत सर्व इस्रोच्या प्लानप्रमाणेच घडत आहे. चांद्रयान-3 मिशनचे दोन उद्दिष्ट पूर्ण झाले आहेत. तर तिसरे उद्दीष्ट लवकरच पूर्ण होण्यास आम्हाला यश येणार आहे. 14 दिवस हे चांद्रमोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रज्ञान रोव्हरने आत्तापर्यंत भरपूर डेटा गोळा केला आहे. 

इस्रोने म्हटलं आहे की, चांद्रयान -3 मोहिमेच्या तीन उद्दिष्टांपैकी दोन उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिग करण्यात आली आहे. तर, विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला आहे. तसंच, चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी भ्रमणदेखील करत आहे. तर, तिसरे उद्दिष्टे म्हणजे आता इन-सिटू विज्ञान प्रयोग सुरू आहेत. सर्व पेलोड्स सामान्यपणे कार्यरत आहेत. डेटा गोळा करण्यासाठी पुढील 14 दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

दरम्यान, इस्रोने चांद्रयान-3 संबंधित एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करत आहेत. यावेळी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरचे टचडाऊन जागा असलेल्या शिव शक्ती जागेजवळच भ्रमण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, प्रज्ञान रोव्हरच्या चाकांना अशोकस्तंभाचे निशाण आहेत. त्यामुळं जेव्हा जेव्हा रोव्हर चंद्रावर भ्रमण करेल तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर अशोकस्तंभाचे निशाण उमटणार आहेत. ही भारतीयांची मान उंचावणारी बाब आहे. 

दरम्यान, चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवस मानले जातात. जिथे विक्रम लँडर उतरला आहे त्या दक्षिण ध्रुवाजवळ आता दिवस असणार आहे. म्हणजेच त्या भागात आता सूर्याचा प्रकाश असणार आहे. त्याचकाळात रोव्हरवर लागलेले सोलार पॅनेल सुरू होणार आहे. जेणेकरुन प्रज्ञान रोव्हरला सूर्याच्या प्रकाशामुळं उर्जा मिळणार आहे.