Chandrayaan 3 Moon Landing: गेल्या काही दिवसांपासून सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या चांद्रयान 3 चं आज लँडिंग (Chandrayaan 3 Landing Date) होणार आहे. भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे असून, चांद्रयान 3 ने यशस्वी लँडिंग केल्यास भारत इतिहास रचणार आहे. चांद्रयान दक्षिण ध्रुवावर लँडिग करणार असून, याआधी कोणत्याही देशाला ही कामगिरी करता आलेली नाही. भारतानंतर रशियाने पाठवलेलं Luna 25 लँडिग करण्यात अपय़शी ठरलं आणि स्फोट झाला. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष चांद्रयान 3 कडे आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. पण चंद्रावर लँडिंग करताना जागेची निवड कशी होते, हे तुम्हाला माहिती आहे का? इस्रो स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे वैज्ञानिक (Isro-Space Applications Centre) आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (Isro-Space Applications Centre) याबाबत नुकताच खुलासा केला आहे.
चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी जागेची निवड करताना आधीच्या चांद्र मोहिमेचा डेटा आणि माहितींचा आधार घेतला जातो. म्हणजेच चांद्रयान 3 च्या लँडिंगची जागा निवडताना चांद्रयान 1, चांद्रयान 2, सेलेन, अमेरिकेच्या नेतृत्वातील लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) मोहीम यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
चांद्रयानचं लँडिंग करताना निकषांमध्ये पृष्ठभागाची रचना, उताराची बाजू, प्रकाशाची उपलब्धता आणि धोका टाळणे या गोष्टींचा समावेश असतो. इस्रो आणि इतर संस्थांच्या शास्त्रज्ञांच्या टीमने चंद्राच्या जवळच्या बाजूला 60° ते 70° दक्षिणेकडील अक्षांश श्रेणीतील 4km x 2.4km जागेचं निरीक्षण केलं आहे. लँडिगच्या ठिकाणी कोणतेही धोके नाहीत हे तपासण्यासाठी फिरत्या विंडो तंत्राचा वापर करण्यात आला आहे.
संधोधकांनी चांद्रयानच्या लँडिगसाटी अमेरिकेच्या LRO च्या Lunar Orbiter Altimeter (LOLA), Selene आणि LRO चे नॅरो अँगल कॅमेरे (NACs) मधील मध्यम-रिझोल्यूशन डेटा वापरून 20 जागांची निवड केली होती. यानंतर चांद्रयान-2 ऑर्बिटरमधील कॅमेरा ऑनबोर्ड OHRC कडील उच्च-रिझोल्यूशन डेटा वापरून आठ जागा निवडण्यात आल्या होत्या. OHRC ने 8 जागांच्या 32cm पिक्सेल रिझोल्युशनपेक्षा चांगल्या आठ स्टिरिओ इमेज मिळवल्या होत्या. ज्याचा वापर डिजिटल एलिव्हेशन मॉडेल तयार करण्यासाठी केला गेला होता.
चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरल्यानंतर तो अधिक सक्रिय होईल. त्याचे रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरेल. त्यानंतर विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर एकमेकांचे फोटो काढून पृथ्वीकडे पाठवतील. चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 25 किमीवर आहे. ताशी 6 हजार किमी वेगावरून त्याचा वेग शून्यावर आणला जाईल. इस्रोकडून आता वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. भारताच्या या कामगिरीकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. चांद्रयान 3 मधील सर्व यंत्रणा व्यवस्थात सुरू असल्याबद्दल इस्रोकडून वारंवार तपासणी केली जात आहे. लँडींगमध्ये काही अडचण जाणवल्यास आजच्या ऐवजी 27 ऑगस्टला लँडिंगचा पर्यायही इस्रोने ठेवला आहे.