चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी 23 ऑगस्टच का निवडण्यात आला? इस्रोचं गणित जाणून घ्या

Chandrayaan 3: चांद्रयान- 3 आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करेल. मात्र इस्रोने सॉफ्ट लँडिगसाठी 23 ऑगस्ट हीच तारीख का ठरवली हे जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 23, 2023, 11:37 AM IST
चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी 23 ऑगस्टच का निवडण्यात आला? इस्रोचं गणित जाणून घ्या title=
why Chandrayaan 3 landing date August 23 chosen by ISRO

Chandrayaan 3: आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. भारतासह संपूर्ण जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ मोहिम आता अंतिम टप्प्यात आहे. 23 ऑगस्ट रोजी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३च्या विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिग होणार आहे. सध्या समस्त देशवासीय या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी इस्त्रोच्या चांद्रयान-2 क्रॅश लँडिग झाली होती. मात्र, यावेळी असं काही न होता ही मोहिम यशस्वी होणार असल्याचा दावा इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केला आहे आणि त्यासाठीच सॉफ्ट लँडिगसाठी 23 ऑगस्ट ही तारिख ठरवण्यात आली आहे. हा तारिखच का ठरवण्यात आली याचे नेमकं कारण जाणून घेऊया. 

23 ऑगस्ट तारीख का ठरवली? 

चांद्रयान-३चे लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर पुढील मिशनची सुरुवात करणार आहे. मिशन पूर्ण करण्यासाठी यानाला सौर्य उर्जेची गरज लागणार आहे. चंद्रावर 14 दिवसांसाठी दिवस आणि 14 दिवसांसाठी रात्र असते. जर चंद्रावर रात्र असताना चांद्रयान पृष्ठभागावर उतरले तर काम करु शकणार नाही.  त्यामुळं इस्त्रोने या सर्व विषयांचा अभ्यास करुनच चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिगसाठी 23 ऑगस्ट हा दिवस ठरवला आहे. 

22 ऑगस्टपर्यंत चंद्रावर अंधार होता. आता रात्र संपली असून आज 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्याचा प्रकाश असणार आहे. 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत दक्षिण ध्रुवावर पर्याप्त सूर्य प्रकाश असणार आहे. ज्याच्या मदतीने चांद्रयानचा रोव्हर चार्ज होऊ शकेल तसंच, मोहिम पूर्ण करु शकेल.

इस्रोचे माजी संचालक प्रमोद काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उणे 230 अंशापर्यंत तापमान जाऊ शकते. इतक्या कडाक्याच्या थंडीत दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाची मोहिम फत्ते करणे थोडे कठिण आहे. त्यामुळं ज्यावेळेस 14 दिवस दक्षिण ध्रुवावर सूर्याचा प्रकाश असेल तेव्हा चांद्रयान-३ मोहिम सहज पूर्ण करु शकणार आहेत. 

भारताने शोधले होते चंद्रावर पाणी 

इस्रोच्या चांद्रयान-१ मोहिमेने चंद्रावर पाणी आहे, हे शोधून काढलं होतं. नासा गेल्या कित्येत वर्षांपासून चंद्रावर पाण्याचा अंश शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते. पण भारताच्या चांद्रयान -१ मोहिमेला हे यशं आलं होतं. त्यामुळं आता समस्त जगभराचे लक्ष्य भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेवर आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेणे, चंद्रावरील खजिनांचा शोध, चंद्रावर बर्फ आहे का? यासारखी उद्दिष्ट्ये सध्या इस्रोकडे आहेत.