गुपचूप लग्न, मुलाला सोडलं अनाथआश्रमात; हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन स्टेटसला ठेवला फोटो

Chennai Crime : चेन्नईत एका प्रियकारने तिच्या प्रेयसीची हत्या करुन सोशल मीडियावर त्याची माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 2, 2023, 02:29 PM IST
गुपचूप लग्न, मुलाला सोडलं अनाथआश्रमात; हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन स्टेटसला ठेवला फोटो title=

Chennai Crime : चेन्नईमध्ये एका नर्सिंगच्या विद्यार्थीनीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. एका हॉटेललमध्ये या तरुणीची हत्या करण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीने प्रेयसीच्या हत्येनंतर तिचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवला होता. यावरुनच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस आता याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शुक्रवारी आरोपीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर नर्सिंगच्या विद्यार्थिनीच्या मृतदेहाचे फोटो पाहून खळबळ उडाली होती. मुलीच्या मित्रांनी हा फोटो पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ क्रोमपेट पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व लॉज आणि हॉटेल्सची झडती घेतली. क्रोमपेट येथील सीएलसी वर्क्स रोडवरील हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या चौकशीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, केरळमधील कोल्लम येथे राहणारी 20 वर्षीय फौजिया आणि 20 वर्षीय आशिक यांनी सकाळी 10.30 वाजता चेक इन केले होते. पोलिसांनी फौजियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी आशिक जवळच्याच एका हॉटेलमध्ये जाताना दिसला. पोलिसांनी तात्काळ हॉटेलकडे धाव घेतली आणि आशिकला अटक केली. फौजिया ही क्रोमपेट येथील महाविद्यालयात नर्सिंगच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती आणि ती न्यू कॉलनीतील वसतिगृहात राहात होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून ती कॉलेजला गेली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी गुपचूप लग्न देखील केले होते. त्यांना किशोरवयातच एक मूल देखील झाले होते. त्यांनी मुलाला चिकमंगळूर येथील अनाथाश्रमात सोडले होते.

पोलिसांनी सांगितले की, हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळातच दोघांमध्ये जोरदार वाद झाला. फौजियाने आशिकला त्याच्या फोनमध्ये असलेल्या त्याच्या आणि अन्य एका महिलेच्या फोटोंबद्दल विचारले. आशिकने त्यावरुन फौजियाला मारहाण केली आणि नंतर टी-शर्टने तिचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर त्याने फौजियाच्या मृतदेहाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला. फौजियाच्या कॉलेजमधल्या काही मैत्रिणींकडे आशिकचा नंबर होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास आशिकचा स्टेटस पाहिला आणि लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी हॉटेलवर जाऊन पाहिले असता फौजिया मृतावस्थेत आढळली.

मिळालेल्या माहितीनुसार, फौजिया आणि आशिक दोन वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. आशिकचे इतर महिलांसोबत संबंध असल्याचे फौजियाला कळले होते. तिने आशिकविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आशिकला अटक करुन तुरुंगात पाठवलं होतं. तुरुंगातून बाहेर येताच आशिकने फौजियाची माफी मागितली आणि समजूत काढली. त्यानंतर तो तिला सतत भेटायला येत होता.