Andhra Pradesh Capital: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (Andhra Pradesh) जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी मोठी घोषणा केली आहे. जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम (Vishakhapattanam) ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल असं जाहीर केलं आहे. येत्या काही दिवसांत आपण तिथे शिफ्ट होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यासह आंध्र प्रदेशात अमरावतीसह आणखी एका शहराला राजधानीचा दर्जा देण्यात आला आहे. हायकोर्टाने गतवर्षी निर्णय देताना कायदा करू शकत नाही असं सांगितलेलं असतानाही राज्य सरकार मात्र तीन राजधानींच्या योजनेवर ठाम आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम येथे आयोजित केलेल्या गुंतवणूक शिखर परिषदेबद्दल बोलताना हे विधान केलं. त्यांनी सातत्याने सागरी किनारा लाभलेल्या या शहराला कार्यकारी राजधानी म्हणून अनुकूलता दर्शविली आहे. तसंच तिथून काम करण्याची इच्छा दर्शवली होती.
"येथे मी तुम्हाला विशाखापट्टणमचं निमंत्रण देण्यासाठी आलो आहे, जी आगामी दिवसात आपली राजधानी असेल," असं सांगताना जगन मोहन रेड्डी यांनी 3 आणि 4 मार्चला शिखर परिषद पार पडेल अशी घोषणा केली. यावेळी त्यांनी कोणतीही वेळमर्यादा जाहीर केली नाही. "मी स्वत: येणाऱ्या काही महिन्यात विशाखापट्टणमला शिफ्ट होणार आहे," असं जगन मोहन रेड्डी यांनी सांगितलं.
आंध्र प्रदेशातून बाहेर पडत तेलंगण नवं राज्य झाल्यानंतर हैदराबादला राजधानी घोषित करण्यात आलं होतं. टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील सरकारने 2015 मध्ये अमरावतीला राजधानी घोषित केलं होतं. 2020 मध्ये सरकारने तीन शहरांना राजधानीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. नंतर हे विधेयक मागे घेण्यात आलं होतं आणि अमरावतीला राजधानी घोषित करण्यात आलं.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी राजधानी म्हणून पसंती दिलेलं विशाखापट्टणम हे सागरी किनारी वसलेलं शहर आहे. विझाग असंही त्याला संबोधलं जातं. हे आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. तामिळनाडूची राजधानी असणाऱ्या चेन्नईनंतर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील दुसरे सर्वात मोठे शहर आहे.