चीफ ऑफ डिफेन्सच्या पदासाठी 'या' अधिकाऱ्याचे नाव आघाडीवर

सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचे असेल.

Updated: Aug 16, 2019, 10:55 AM IST
चीफ ऑफ डिफेन्सच्या पदासाठी 'या' अधिकाऱ्याचे नाव आघाडीवर title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात भारतीय लष्करासंदर्भात एक मोठा निर्णय जाहीर केला होता. देशाच्या संरक्षणाच्यादृष्टीने तिन्ही सैन्यदलांमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) या स्वतंत्र पदाची निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

तेव्हापासून या पदावर कोणाच वर्णी लागणार, याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या शर्यतीत लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे नाव आघाडीवर आहे. 

भारतीय हवाईदल प्रमुख बी.एस. धनोआ ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. बिपीन रावत यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचे असेल. या पदावरील व्यक्ती निवडण्यासाठी मोदी सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी सीडीएस निवडण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सुब्रहण्यम समिती तर मनमोहन सिंग यांच्या काळात नरेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, राजकीय सहमतीअभावी हा निर्णय होऊ शकला नव्हता. 

मात्र, आता मोदींचा निर्णय घेण्याचा धडाका पाहता लवकरच याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावरील व्यक्ती तिन्ही सैन्यदलांमध्ये सुसूत्रता आणण्याबरोबरच खरेदी, प्रशिक्षण, रसद आणि आर्थिक व्यवस्थापन यासंर्भात निर्णय घेईल.