मोबाईल वापरावरुन पालक ओरडल्याने तिने धबधब्यात मारली उडी; छत्तीसगडमधील धक्कादायक घटना

Girl Jump In Waterfall Due To Mobile Addiction: ही तरुणी धबधब्यामध्ये उडी मारणार असल्याचं पर्यटकांना समजल्यानंतर तिची समजूत काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. बोलता बोलता या तरुणीने स्वत:ला धबधब्यात झोकून दिलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 19, 2023, 08:12 AM IST
मोबाईल वापरावरुन पालक ओरडल्याने तिने धबधब्यात मारली उडी; छत्तीसगडमधील धक्कादायक घटना title=
पर्यटकांसमोरच घडला हा सारा प्रकार

Girl Jump In Waterfall Due To Mobile Addiction: छत्तीसगडमधील मिनी नायगरा फॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रकोट धबधब्याजवळ एक फारच धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने या धबधब्यामध्ये उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या तरुणीला वाचवण्यात यश आलं आहे. या तरुणीने टोकाचं पाऊल उचलण्यामागील धक्कादायक कारण समोर आलं आहे. हे कारण ऐकून सारेजण थक्क झाले आहेत. 

अनेकदा बसायचा ओरडा

अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवोदिता पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणीचं वय 21 वर्ष आहे. सरस्वती मौर्य असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी सतत मोबाईल पाहण्यातच व्यस्त असायची. तिच्या या सवयीमुळे तिचे नातेवाईकही वैतागले होते. या मुद्द्यावरुन अनेकदा तिला नातेवाईक ओरडायचे. मात्र याचवरुन नाराज झाल्याने सरस्वती थेट चित्रकोट धबधब्या जवळ पोहोचली आणि तिने थेट धबधब्यात उडी मारली.

पर्यटकांनी प्रयत्न केला पण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना जेव्हा सरस्वती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचं समजल्यानंतर त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र या लोकांचं सरस्वतीने काहीही ऐकलं नाही आणि एका क्षणाला स्वत:ला धबधब्यात झोकून दिलं. सरस्वतीने धबधब्यात उडी मारल्याचं पाहून अनेकांच्या पाया खालची जमीन सरकली. सरस्वतीने उडी मारल्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला. नेमकं काय करावं हे कोणालाच कळेना. पावसाळ्यामुळे धबधब्याचा प्रचंड प्रवाह असल्याने सरस्वतीचं नेमकं काय झालं याचा अंदाज वर उभ्या असलेल्या पर्यटांना येईना. काहींनी पोलिसांना फोन करुन यासंदर्भातील माहिती दिली.

उडी मारल्यावर चूक समजली

दुसरीकडे उडी मारल्यानंतर आपण चूक केल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड केली. सुदैवाने कोणत्याही दगडावर ती आपटली नाही. नदीत पडल्यानंतर ती स्वत: पोहत नदीच्या काठाकडे येऊ लागली. त्यावेळी या ठिकाणी सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या स्थानिक गावकऱ्यांनी तिला मदत केली. सुरक्षेसाठी येथे असलेल्या गावकऱ्यांच्या बोटींपैकी एक बोट लगेच सरस्वतीच्या मदतीसाठी आली. सरस्वतीला बोटीत खेचून घेण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरस्वती ही चित्रकोट गावातील रहिवाशी आहे.

अनेकांची चौकशी होण्याची शक्यता

पोलीस या प्रकरणामध्ये पुढील तपास करत असून केवळ मोबाईल हेच या मागील कारण आहे की अन्य काही याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी सरस्वतीबरोबरच तिच्या नातेवाईकांची तसेच मित्रमैत्रिणींचीही चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सरस्वतीचा जीव वाचल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.