येत्या काळात थंडी वाढणार, मनालीमध्ये पुन्हा हिमवृष्टीची शक्यता

उत्तर भारतात पारा आणखी खाली येण्याची शक्यता

Updated: Nov 20, 2020, 12:07 PM IST
येत्या काळात थंडी वाढणार, मनालीमध्ये पुन्हा हिमवृष्टीची शक्यता title=

मुंबई : दिवाळीपासून आता थंडी वाढू लागली आहे. दिल्ली, लखनऊ, पटना, मनाली आणि श्रीनगरसह देशातील बहुतेक शहरांमध्ये आगामी काळात हवामान बदलणार आहे, त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक शहरात किमान तापमान 2 अंशांनी खाली येण्याची शक्यता आहे. पाटणा आणि लखनऊमधील किमान तापमानात 3 ते 5 अंशांची घसरण होऊ शकते, म्हणजेच रात्री अधिक थंड वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हवामानतज्ज्ञ पुन्हा मनाली आणि श्रीनगरमध्ये हिमवृष्टीची शक्यता वर्तवत आहेत.

दिल्ली, लुधियाना, चंदीगडसह देशातील बर्‍याच शहरांमध्ये तापमान सामान्यपेक्षा खाली पोहोचल्याचे स्कायमेटचे हवामानतज्ज्ञ महेश पलावत यांनी सांगितले. येत्या तीन-चार दिवसात फारसा बदल होणार नाही.

14 नोव्हेंबरला आणि त्यापूर्वी नोव्हेंबरच्या सुरूवातीला नवी दिल्लीमध्ये कमाल तापमान 28 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत होते. त्याच वेळी, किमान तापमान 14 ते 16 अंशांच्या जवळ होते, परंतु 19 नोव्हेंबरपर्यंत केवळ सौम्य, परंतु थंडी वाढली. राजधानीत कमाल तापमान 25 अंश आणि किमान तापमान 10 अंशांवर घसरले. डोंगराळ भागात नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीनंतर थंड वारे वाहू लागल्याने थंडी वाढली.

'नवी दिल्लीत 21 नोव्हेंबरपासून कमाल तापमान 23 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल तर किमान तापमान 9 अंशापर्यंत घसरेल. यानंतर संपूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आसपास परिस्थिती अशीच असेल. असा अंदाज आहे की 18 डिसेंबरनंतर पुन्हा पारा घसरण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे डिसेंबरपर्यंत किमान तापमान 6 अंश सेल्सिअस होईल.' अशी माहिती हवामाना विभागाने दिली आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि पटनामध्ये देखील तापमान घसरण्याची शक्यता आहे. हंगामाच्या पहिल्या हिमवृष्टीनंतर दोन दिवसात हिमाचल प्रदेशमध्ये थंडी वाढली. मनाली येथे 19 नोव्हेंबर रोजी तापमान कमाल 5 व किमान -5 इतके नोंदवले गेले आहे. संपूर्ण आठवड्यात किमान तापमान शून्याच्या खाली राहण्याची शक्यता आहे.

श्रीनगरमध्ये सुरू असलेली हिमवृष्टी आता थांबण्याची अपेक्षा आहे. परंतु 23 ते 25 या काळात पुन्हा एकदा बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून तापमान शून्य आणि वजा पर्यंत राहू शकते.