थंडी वाढणार, दिल्ली, हरियाणामध्ये पाऊस, तर काश्मीर, हिमाचलमध्ये हिमवृष्टी

हिमवृष्टी आणि पावसामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 16, 2020, 08:52 AM IST
थंडी वाढणार, दिल्ली, हरियाणामध्ये पाऊस, तर काश्मीर, हिमाचलमध्ये हिमवृष्टी

नवी दिल्ली : डोंगरांवर बर्फवृष्टी आणि पावसाचा परिणाम आता मैदानी भागावर देखील दिसू लागला आहे. हिवाळ्यातील पहिला पाऊस रविवारी संध्याकाळी दिल्लीत झाला. हा पाऊस जरी सौम्य असला तरी सोमवारपासून त्याचा परिणाम दिसून येईल. थंडी वाढेल आणि तापमानात घट होईल. हरियाणामध्ये मुसळधार गारपिटीमुळे शिमला सारखी परिस्थिती आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी कमाल तापमान सामान्य तापमानाच्या एक अंशाहून अधिक २९.१ डिग्री सेल्सियस इतकं नोंदविण्यात आले तर किमान तापमान ११.४ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. स्कायमेट वेदर चीफ हवामानशास्त्रज्ञ महेश पलावत यांच्या मते, दिल्ली, हरियाणासह एनसीआर, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्येही रविवारी मुसळधार पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीटही झाली. सोमवारीसुद्धा अंशतः ढगाळ वातावरण राहील.

दिवाळीनंतर रविवारी संध्याकाळी दिल्लीत पाऊस झाला. मोठ्या संख्येने लोकांनी तेलाच्या पावसाची दिल्ली अग्निशमन विभागाकडे तक्रार केली. पाऊस पडल्यानंतर एका तासाच्या आत विभागाला 57 तेलाशी संबंधित कॉल आले. दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले की, पावसामुळे वातावरणात उपस्थित धूळ व इतर रसायने पाण्याच्या थेंबासह रस्त्यावर पडली. यामुळे रस्ते निसरडे झाले.

हरियाणामध्ये रविवारी दुपारी जोरदार वादळासह पाऊस झाला, जो सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. यामुळे रस्त्यावर बर्फाचे ढीग लागले आणि शिमल्यासारखे दृष्य दिसत होते. वादळामुळे हंसी-चंदीगड मार्गावर शेकडो झाडे कोसळली.

जम्मू-काश्मीरमधील दिवाळीच्या दिवशी रविवारी वातावरण कडाक्याच्या थंडीत बदलले. राज्यात हिमवृष्टी आणि पावसामुळे थंडी वाढली आहे. जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्गसह काश्मीरच्या वरच्या भागात हिम चादर पसरली आहे. हवामान खात्याने दोन दिवस मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. हिमाचल प्रदेशात रविवारी पहाटे लाहुल-स्पीती, किन्नौरसह चंबा, कांगड़ा आणि कुल्लूच्या टेकड्यांवर हिमवृष्टीला सुरुवात झाली, तर मैदानावर रिमझिम पाऊस झाला.