पंतप्रधान नरेंद्र मोदी काय लपवत आहेत? नारायण राणेंच्या 'त्या' विधानानंतर काँग्रेसचा प्रश्न

Congress on PM Modi: भारताला आर्थिक मंदीचा फटका बसणार? नारायण राणेंच्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  

Updated: Jan 17, 2023, 03:36 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय लपवत आहेत? नारायण राणेंच्या 'त्या' विधानानंतर काँग्रेसचा प्रश्न title=
काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

Jairam Ramesh on Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंदीची शक्यता वर्तवल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री देशापासून काय लपवत आहेत? अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. सोमवारी पुण्यात बोलताना नारायण राणे यांनी जून महिन्यानंतर मंदीचा फटका बसू शकतो असं म्हटलं आहे. मंदीचा फटका देशाला बसू नये यासाठी केंद्र सरकार त्यादृष्टीने काम करत असल्याचंही ते म्हणाले होते. 

हेसुद्दा वाचा - Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा बेळगाव बंदी, मराठी भाषिकांमध्ये संताप

नारायण राणे यांच्या विधानानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट केलं आहे. "नारायण राणे यांनी सहा महिन्यांनी मंदीचा फटका बसू शकतो असं म्हटलं आहे. पुण्यातील जी-20 कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्री देशापासून काय लपवत आहेत?," अशी विचारणा जयराम रमेश यांनी केली आहे.

"जागतिक मंदी असून अनेक देशांना याचा फटका बसला आहे. केंद्र सरकारच्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चांमधून मला ही माहिती मिळाली आहे. जून महिन्यानंतर भारताला मंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे," असं नारायण राणे यांनी पुण्यातील दोन दिवसीय जी 20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपच्या (आयडब्ल्यूजी) बैठकीत उद्घाटनपर भाषणात  सांगितलं.
 
"मंत्रिमंडळात असल्याने माझ्याकडे काही माहिती उपलब्ध असून मोदींकडून जे काही सल्ले मिळतात त्याच्या आधारे मी सांगू शकतो की, अनेक मोठ्या देशांमध्ये आर्थिक मंदी आहे. हे सत्य आहे," असं राणे यांनी म्हटलं. दरम्यान भारताला मंदीचा फटका बसू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार काम करत असल्याचंही ते म्हणाले. 

दरम्यान दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संशोधन विभागाने अहवाल सादर केला असून महागाई (Inflation), व्याजदर (Interest Rate) आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला आहे. अर्थव्यवस्था ढासळत असल्याने अनेकांना नोकऱ्याही गमवाव्या लागू शकतात. 2023 मध्ये जगभरातील कोट्यवधी लोक बेरोजगार (Unemployed)होण्याची भीती अहलावातून व्यक्त करण्यात आली आहे.