छत्तीसगडमधून धक्कादायक आणि ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका काँग्रेस नेत्याने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली आहे. जांजगीर चांपा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. काँग्रेस नेत्याने पत्नी आणि दोन्ही मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केली. यामधील मोठ्या मुलाचा घरातच मृत्यू झाला. पत्नी आणि छोट्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना बिलासपूरमधील सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिघांनीही अखेरचा श्वास घेतला. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असा संशय आहे. कोतवाली पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
66 वर्षीय पंचराम यादव, 55 वर्षीय त्यांच्या पत्नी दिनेश नंदनी यादव, 28 वर्षीय मुलगा नीरज यादव आणि 25 वर्षीय मुलगा सूरज यादव अशी सर्वांची ओळख पटली आहे. या सर्वांनी 30 ऑगस्टला विषप्राशन केलं होतं. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
काँग्रेस नेते पंचराम यादव हे जंजगीर नगरपालिकेत कंत्राटदार म्हणून काम करायचे. त्यांनी कर्ज घेतल्याचं सांगितलं जात आहे. कर्जामुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते. पंचरामने पत्नी नंदिनी यादव, मुलगा नीरज यादव आणि सूरज यादव यांच्यासह कीटकनाशक प्यायले. एएसपी राजेंद्र कुमार जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी चौघांनाही सिम्स बिलासपूर येथे रेफर केलं. मोठा मुलगा नीरजचा मृत्यू झाला. बाकी सर्वांवर सिम्स बिलासपूर येथे उपचार सुरू होते. जिथे रविवारी सकाळी तिघांचाही मृत्यू झाला.
कोणालाही आत्महत्येबाबत समजू नये यासाठी त्यांनी घराच्या दरवाजाला टाळं लावलं होतं. यानंतर मागच्या दरवाजाने घरात प्रवेश करत आतूनही दरवाजा बंद केला होता. शेजारी राहणारी एक मुलगी त्यांच्या घरी गेली असता ही घटना उघडकीस आली. मुलीने दोन ते तीन वेळा आवाज दिल्यानंतरही जेव्हा घऱातून कोणी उत्तर दिलं नाही तेव्हा मुलीला शंका आली. तिने शेजाऱ्यांना यासंबंधी माहिती दिली. शेजारी आणि नातेवाईकांनी घरात प्रवेश केला असताना सर्वजण मृतावस्थेत पडले होते. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. आत्महत्येसाठी डोक्यावरील कर्जाचा डोंगर कारणीभूत होता की अन्य काही याची माहिती पोलीस घेत आहेत.